<
नागपूर(प्रतिनिधी)- कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांच्या पाठीशी राज्याचे आघाडी शासन पालक म्हणून उभे आहे. या बालकांच्या संगोपनात पाच लाखाची मुदत ठेव निश्चितच महत्त्वाची ठरणार आहे, तथापि,आपल्या दुःखापुढे ही मदत काहीच नाही. मात्र फुल ना फुलाची पाकळी म्हणून शासनाने दिलेल्या या मदतीचा योग्य वापर करा, आपले जीवन घडवा, असे आवाहन आणि अपेक्षा राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी एका भावनिक कार्यक्रमात केले.
कोविड-19 मुळे अनाथ झालेल्या बालकांना 5 लक्ष रुपयाचे मुदत ठेव प्रमाणपत्र व अनाथ प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी विमला आर., जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अपर्णा कोल्हे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष राजीव थोरात, बाल न्याय मंडळाचे सदस्य श्री. जोगी, सुरेखा बोरकुटे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. साळवे, एकात्मिक बाल विकास अधिकारी चिचाणे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण आदी यावेळी उपस्थित होते.
ज्या बालकांचे वय 18 पेक्षा कमी आहेत, अशी नागपूर जिल्ह्यात 71 बालके अनाथ आहेत. त्यापैकी 61 बालकांच्या बँकेत खाते उघडण्यात आले आहेत. 52 लाभार्थ्यांची रक्कम सेंट्रल बँक इंडीयामध्ये जमा झालेली आहे. अनाथ झालेल्यांना वयाची 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुदत ठेवची रक्कम मिळणार आहे. जीवनात आलेल्या प्रसंगाला सामोरे जावे लागते. या संकटाच्या काळात या अनाथांच्या पाठिशी आपण उभे राहिले पाहिजे, अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली. राज्याच्या महिला व बालविकास विभागातर्फे कोविड काळात अनाथ बालकांना मदत करण्याचा निर्णय झाला. पाच लाख रुपयांची मदत पुरेशी आहे, असा आमचा दावा अजिबात नाही. आई-वडीलांची भरपाई कुणीही करू शकत नाही. परंतु फुल ना फुलाची पाकळी या न्यायाने महाविकास आघाडी सरकारने ही मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. ही मुदत ठेव निश्चितपणे आपल्या भावी आयुष्यात कामी येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.