<
नाशिक(जिमाका वृत्तसेवा)- ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी करण्यासाठी तसेच सणोत्सवांच्या अनुषंगाने लसीकरण वाढविण्यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.आज येवला विश्रामगृह येथे निफाड व येवला तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संजय बनकर, प्रांताधिकारी सोपान कासार, डॉ. अर्चना पठारे, तहसिलदार प्रमोद हिले, शरद घोरपडे, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस शैलजा कृपास्वामी, मनमाड महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता संजय तडवी, येवला महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता आर. एम. पाटील, येवला नगरपरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता नांदूरकर, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, तालुका कृषि अधिकारी ए. एस. आढाव, बी.जी. पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुजित कोशिरे, डॉ. हर्षल नेहेते, येवला गट विकास अधिकारी डॉ. उमेष देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आर. पुरी, जे. डी. हगवणे आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी मालेगावच्या धर्तीवर धर्मगुरू यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. रुग्णसंख्या कमी करण्याकरीता त्रिसूत्रीच्या वापरासोबतच लसीकरण महत्त्वाचे आहे. शंभर टक्के लसीकरण होण्यासाठी लसीकरण केंद्राची संख्या वाढविण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी दिल्या आहेत.तालुक्यात सुरू करण्यात आलेला ऑक्सिजन प्रकल्प सुरळीतपणे सुरू राहणे आवश्यक आहे. त्यासाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी देखभाल दुरुस्ती करणाऱ्या कंपनीसोबत समन्वय साधून प्रकल्पाचा वीज पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी नियोजन करावे, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.