<
दिल्ली(प्रतिनिधी)- ‘बार्डो’ या मराठी चित्रपटाला 67 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देऊन आज उपराष्ट्रपती वैकंया नायडू यांनी गौरव केला. नर्गिस दत्त राष्ट्रीय एकात्मता पुरस्कारासाठी ‘ताजमाल’ तर सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘आनंदी गोपाळ’ या मराठी सिनेमाला पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विज्ञान भवनात 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन, माहिती व प्रसारण विभागाचे सचिव अपूर्व चंद्रा आणि अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. आज दिले गेलेले पुरस्कार वर्ष 2019 चे आहेत.
‘बार्डो’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ‘बार्डो’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शक भीमराव मुडे हे आहेत. रितु फिल्मस कट एलएलपीने हा चित्रपट निर्माण केलेला आहे. याच चित्रपटातील ‘रान पेटला…’ या गाण्याच्या गायिका सावनी रवींद्र यांना सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावरील श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. यासोबतच या सिनेमाला उत्कृष्ट प्रोडक्शन डिजाइनचाही पुरस्कार मिळाला आहे. प्रोडक्शन डिसाइन सुनील निगवेकर आणि निलेश वाघ यांनी केले आहे.राष्ट्रीय एकात्मता या विषयावरील नर्गीस दत्त राष्ट्रीय पुरस्कार ‘ताजमाल’ या सिनेमाला प्रदान करण्यात आला आहे. हा सिनेमा नियाज मुजावर यांनी दिग्दर्शीत केला आहे.
तर टूलाईन स्टूडियो प्रा.लि. यांची निर्मिती आहे.‘ताकश्ंत फाईल’ या हिंदी सिनेमासाठी पल्लवी जोशी यांना उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ‘सुपर डिलक्स’ या तमिळ सिनेमासाठी विजय सेथुपथी यांना सहायक अभिनेता या श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.