<
जळगाव(प्रतिनिधी)- जिल्ह्यात विशेषतः जळगाव शहरात अनेक ठिकाणी सट्टा, जुगार अड्डे मोबाईल द्वारे सट्टा तत्सम अवैध धंद्यांचा सुळसुळाट झालेला आहे. त्यामुळेच गुन्हेगारी देखील प्रचंड प्रमाणात वाढलेली असुन सातत्याने लहान मोठे गुन्हे घडत आहेत. याविषयी अनेकदा सामाजिक कार्यकर्ते व जनता आवाज उचलत असून स्थानिक वृत्तपत्र व चॅनेल्स च्या माध्यमातुन देखील बातम्या प्रसारित करण्यात आलेल्या असुन पोलीस प्रशासनाचे वाभाडे काढलेले आहे.
तरी देखील अवैध धंदे राजरोसपणे व जोमाने सुरू आहेत. फक्त सर्व आलबेल आहे असे वरिष्ठांना दाखविण्यापुरता अधुनमधुन एखाद्या अवैध व्यवसायावर कारवाई करण्यात येते व इतर सर्व अवैध धंदे सुरूच असतात. कोरोनामुळे सर्वसामान्य जनता आधीच होरपळून निघाली आहे व अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीमुळे उपासमारीत जगत आहे. दुर्दैवाने या अवैध व्यवसायांना असेच गोरगरीब, कष्टकरी, कामगार, श्रमिक जनता बळी पडत आहेत. अनेकांचे संसार उध्वस्त होत असुन युवक वाममार्गाला लागत आहेत. सदर अवैध धंदे बंद करण्यासाठी राष्ट्रीय दलित पँथरचे जळगाव महानगराध्यक्ष शांताराम बुधा अहिरे यांच्यातर्फे दिनांक 13/11/2021 रोजी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक जळगाव यांना निवेदन देऊन सात दिवसांत अवैध धंदे बंद न झाल्यास आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता.
तरीही अवैध धंदे बंद झाले नाही म्हणून श्री. अहिरे दिनांक 20/11/2021 पासुन आजतागायत आमरण उपोषणाला बसलेले आहेत. परंतु अद्यापही पोलीस प्रशासनातर्फे अवैध व्यवसाय बंद करण्यात आलेले नाहीत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया मार्फत कुणीही जबाबदार अधिकाऱ्यांनी श्री. अहिरे यांना अवैध धंदे बंद करण्याबाबत लेखी व तोंडी आश्वासन तर दिले नाहीच शिवाय याविषयी चर्चा करण्याचे सौजन्य देखील दाखवले नाही. यावरूनच अवैध धंदे चालक व पोलीस प्रशासन यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक साटेलोटे आहे हे दिसुन येते.
लोकशाहीच्या दृष्टीने हि बाब अत्यंत खेदजनक व निंदनीय आहे. श्री. अहिरे यांना आमरण उपोषणा दरम्यान बरेवाईट झाल्यास त्यास लोकशाहीची चेष्टा करणारे संबंधित अधिकारीच जबाबदार राहतील. सर्व अवैध व्यवसायांवर कठोर कायदेशीर कारवाई करून कायमस्वरूपी बंद करण्यात यावे व जळगाव जिल्हा कायमस्वरूपी सट्टा व जुगार मुक्त करावा. सदर निवेदनाची दखल न घेतल्यास व अवैध व्यवसाय बंद न केल्यास छावा मराठा युवा महासंघ व अनेक सामाजिक संघटना यांच्यातर्फे व्यापक स्वरूपात जनआंदोलन छेडण्यात येईल. असा निवेदन वजा इशारा छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांच्यावतीने देण्यात आला आहे.