<
जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- रब्बी हंगामातील हंगामी पिकांसाठी शेतकऱ्यांनी पाणी अर्ज सादर करावेत, असे आवाहन धुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एन. एम. व्हट्टे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.
कार्यकारी अभियंता श्री. व्हट्टे यांनी म्हटले आहे, त्यांच्या अधिपत्याखालील धुळे जिल्ह्यातील पांझरा, मालनगाव, जामखेडी, बुराई, कनोली, सोनवद, अक्कलपाडा, वाडीशेवाडी, अनेर, करवंद, अमरावती, सुलवाडे बॅरेज असे मध्यम प्रकल्प, 45 लघु प्रकल्प, कोल्हापूर पध्दतीचे 22 बंधारे, 30 वळण बंधारे असे 109 प्रकल्प तसेच नंदुरबार जिल्ह्यातील रंगावली, प्रकाशा, सारंगखेडा मध्यम प्रकल्प असे 3, लघुप्रकल्प 33, कोल्हापूर पध्दतीचे सहा बंधारे आणि 20 वळण बंधारे मिळून 62 तसेच धुळे व नंदुरबार अधिसूचित नदी/नाले तसेच तापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजना यांच्या पाण्याचा लाभ घेणाऱ्या बागायतदारांनी 14/10/2021 ते 28/2/2022 या कालावधीकरीता सुरू झालेला रब्बी हंगाम 2021- 2022 मध्ये भुसार/ अन्नधान्ये/ चारा/ डाळी /कपाशी/ भुईमूग व इतर हंगामी पिके इत्यादी पिकांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बागायतदार शेतकऱ्यांनी आपले नमुना क्रमांक 7, 7 (अ), (ब) चे पाणी अर्ज संबंधित शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात 31/12/2021 रोजी सायंकाळी 5.45 वाजेपर्यंत देण्याचे करावे.पाणी अर्ज स्वीकारण्याच्या शर्ती पुढील प्रमाणे : पाण्याच्या उपलब्धतेनुसार मंजुरी देण्यात येईल. बागायतदारांनी आपापल्या शेतचाऱ्या स्वच्छ व सुस्थितीत ठेवाव्यात. पाणी अर्ज स्वीकारण्याची मुदत पुरेशी देण्यात आलेली आहे. मुदतीनंतर आलेल्या पाणी अर्जाचे मंजुरीबाबत उपलब्ध पाणीसाठा व अगोदर आलेली मागणी विचारात घेवून नंतरच मंजुरी/ ना मंजुरीचा विचार करण्यात येईल. मंजुरी व पाणी पुरवठ्याबाबत अन्नधान्ये/ भुसार/ चारा पिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. पाण्याचा रितसर पास मिळाल्याशिवाय पाणी घेवू नये. थकबाकीदारांनी मागील संपूर्ण थकबाकी व दरसाल दर शेकडा 10 टक्के जादा आकारासह भरणे आवश्यक आहे. पाणी नाश, पाळी नसताना पाणी घेणे, पाटमोट संबंध दूर न करणे वगैरे गुन्हे करणाऱ्या बागायतदारांचे नियमानुसार पंचनामे करण्यात येतील व दंडाचे दराने आकारणी करण्यात येईल.
टंचाई परिस्थितीत ऐन हंगामात पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा लागल्यास पीक नुकसान भरपाई देता येणार नाही. विहित दिनांकापर्यंत पाणी अर्ज शाखा कार्यालय किंवा उपविभागीय कार्यालयास देवून पोहोच पावती घेतली पाहिजे. लाभ क्षेत्रातील तसेच कालव्यापासून 35 मीटर अंतराच्या हद्दीतील विहिरींबाबत नमुना 7 (ब) मागणी अर्ज न करता बिन अर्जी क्षेत्र भिजविण्यात आल्यास प्रचलित नियमानुसार पंचनामे करण्यात येतील. हस्तांतर झालेल्या पाणी वापर संस्थांना घनमापन पध्दतीने पाणी देण्यात येईल, असेही कार्यकारी अभियंता श्री. व्हट्टे यांनी म्हटले आहे.