<
मुंबई(प्रतिनिधी)- राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या गट ‘ड’ संवर्गातील लेखी परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यास आज सुरुवात झाली आहे. सुमारे सव्वा तीन लाख उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेतले आहे. इतर उमेदवारांनीही प्रवेश पत्र संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घ्यावी, असे आवाहन आरोग्य सेवा संचालक डॉ अर्चना पाटील यांनी केले आहे.
उमेदवारांना काही शंका अथवा समस्या असल्यास 9513315535, 7292013550 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.आरोग्य विभागाच्या गट ड संवर्गातील रिक्त पदाच्या भरतीसाठी येत्या रविवारी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. त्याबाबत डॉ. पाटील यांनी तयारीबाबत आणि परीक्षेच्या काही मुद्यांबाबत सविस्तर निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी नमूद केलेले मुद्दे पुढीलप्रमाणे न्यासा कम्युनिकेशन कंपनीस गट-क व गट-ड भरतीचे काम करण्यासाठी करारबद्ध करण्यात आले होते.
या कंपनीमार्फत गट ‘क’ संवर्गाची परिक्षा २४.१०.२०२१ रोजी घेण्यात आली आहे. करारातील अटी व शर्तीनुसार प्रश्नपत्रिका संच गोपनीयरित्या कंपनीस हस्तांतरण करण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची होती. इतर सर्व जबाबदारी कंपनीची आहे.गट ड संवर्गातील राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कार्यालयातील ४२ संवर्गातील ७८ कार्यालयातील ३४६२ पदे भरण्यासाठी ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी लेखी परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता ४,६१,४९७ उमेदवारांचे अर्ज प्राप्त असून १३६४ केंद्रांवर परीक्षा आयोजन करण्यात आले आहे.
परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी आरोग्य विभागाने कंपनीस आवश्यक असणारे सर्व सहकार्य केले आहे. कंपनीने केलेल्या सर्व कामकाजाचा आढावा घेतलेला आहे. आरोग्य सेवा आयुक्त एन. रामास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी व कंपनीचे वरिष्ठ प्रतिनिधी यांची दैनंदिन आढावा बैठक व्हीसीद्वारे दररोज घेण्यात येत होती. यामध्ये प्रामुख्याने परिक्षा केंद्रांचे आरक्षण, समावेक्षकांचे प्रशिक्षण, प्रवेश पत्र वाटप याबाबतचा दैनंदिन आढावा घेण्यात येत होता. कंपनीस आवश्यक असणारे सर्व सहकार्य आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. विभागातील सर्व मंडळ व जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी योगदान देत आहेत.