<
अहमदनगर(जिमाका)- कोवीड काळात सर्व उद्योग बंद असतांना या देशाला तारण्याचे काम देशाच्या शेती क्षेत्राने केले आहे. शेतीला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज असून त्याचबरोबर कृषी व तंत्रज्ञान या विषयांचे शिक्षण मराठी भाषेतून देण्यासाठी कृषी विद्यापीठांनी प्रयत्न करावेत, असे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा पस्तीसावा पदवी प्रदान (दीक्षांत) समारंभ पार पडला. त्यावेळी राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी स्नातकांना अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन केले. व्यासपीठावर केंद्रिये रस्ते, वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी, खासदार शरद पवार, कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा विद्यापीठाचे प्रति कुलपती दादाजी भुसे, उदयपूर येथील महाराणा प्रताप कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नरेंद्र सिंह राठौड, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी.पाटील,अधिष्ठाता डॉ.प्रमोद रसाळ उपस्थित होते.
यावेळी खासदार शरद पवार आणि केंद्रीय परिवहन मंत्री श्री.नितीन गडकरी यांना कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी देऊन सन्मानीत करण्यात आले.
राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये उत्कृष्ट दर्जाचे संशोधनाचे काम होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा कौशल्याने वापर करत नावीन्यपूर्ण काम झाले आहे. विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक वृत्ती ठेवत काम केल्यास देशाची विकासाकडे वाटचाल होईल. तसेच कृषी विद्यापीठांनी मातृभाषेचा सन्मान करत कृषी व तंत्रज्ञानाचे शिक्षण व कामकाज मराठी भाषेतून करण्यावर भर द्यावा. कृषी विद्यापीठांनी अधिकाधिक पेटंट प्राप्त करावेत. सेंद्रिय व जीआय तंत्रज्ञानावर आधारित शेती व्हावी. यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.असे ही श्री.कोश्यारी यांनी सांगितले.
श्री.शरद पवार व श्री.नितीन गडकरी यांनी कृषी व तंत्रज्ञान क्षेत्रात देशाला मार्गदर्शक ठरेल असे काम केले आहे. त्यांना देण्यात आलेल्या डी.एस्सी पदवींमुळे या पदवीची उंची वाढली आहे. असे गौरवोद्गारही श्री.कोश्यारी यांनी काढले.