<
पाचोरा(प्रतिनिधी)- अवकाळी पावसाने पाचोरा-भडगाव मतदार संघातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. तर आता खरीपात अतिवृष्टीतही खरीप हंगाम पुर्णपणे झोपुन गेला. त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला होता. त्या पार्श्वभूमीवर आ. किशोर पाटील यांनी सातत्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत पाठपुरावा केला.
त्याची फलश्रुती म्हणुन राज्य शासानने रब्बी व खरीप या दोन्ही हंगामाची मदत जाहीर करून प्रत्यक्ष वाटपाला ही सुरवात झाली आहे. ऐन दिवाळीत दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना तब्बल 100 कोटी रूपये मदत मिळणार असल्याचे आ. किशोर पाटील यांनी पत्रकार परीषदेत सांगीतले.
आ.किशोर पाटील पुढे म्हणाले की, रब्बी हंगामात मार्च महीन्यात भडगाव, पाचोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यावेळी मी स्वत: शेतकऱ्यांची व्यथा पाहीली. ते दुख: विसरून शेतकऱ्यांनी खरीप हंगाम उभा केला. मात्र पुन्हा ऑगस्ट ते ऑक्टोबर महीन्यात अतिवृष्टीत पाचोरा-भडगाव तालुक्यातील खरीप हंगाम पुर्णत: पाण्यात बुडाला. कापुस, मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांनी केलेला खर्च निघणेही मुश्किल झाले आहे. ही परीस्थीती पाहणे माझ्यासाठी अवघड होते. म्हणून मी शेतकऱ्यांची फेसबुक द्वारे संवाद साधत शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचे वचन दिले.
त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना एसडीआरएफ च्या निकषाच्या तीन पट भरपाई द्यावी अशी मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला तर रब्बीत झालेल्या नुकसानीची ही तातडीने शेतकऱ्यांना भरपाई द्यावी ही ही मागणी केली त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी चार दिवसात रब्बी हंगामाच्या नुकसानीची मदत जाहीर केली. तर अतिवृष्टीची पुर्वीच्या निकषापेक्षा अधिकची मदत जाहीर केली.
‘रब्बी’ चे 19 कोटी अनुदान -रब्बी हंगामाच्या नुकसानीपोटी जळगाव जिल्ह्याला 35 कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले. त्यापैकी तब्बल 19 कोटी 50 लाख अनुदान भडगाव- पाचोरा या तालुक्यांना मिळाले त्यातील 18 कोटी एकट्या भडगाव तालुक्याला तर पाचोरा तालुक्याला एक कोटी 31 लाख रुपये एवढे अनुदान प्रत्यक्ष प्राप्त झाले आहेत. त्याचे वाटपाचे काम महसूल प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात या अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत. म्हणजे पाचोरा भडगाव मतदार संघाला 50 टक्के पेक्षाही अधिक अनुदान मिळवण्यात आपल्याला यश आले. याचे मोठे समाधान असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.
खरीपाला मिळणार 80 कोटी -ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान पाचोरा भडगाव तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना साधारणपणे 80 कोटी रुपयाचे अनुदान मिळणार आहे. त्यात पाचोरा तालुक्याला 50 कोटी तर भडगाव तालुक्याला 30 कोटी रुपयांचे अनुदान मिळण्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत शासनाने कालच निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे दोन-चार दिवसात तेही अनुदान प्रत्यक्षरीत्या त्या-त्या तालुक्यांना प्राप्त होईल. त्यानंतर जलद गतीने अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहेत यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी निश्चितपणे आनंदात जाईल याची मला खात्री आहे आणि आनंदही असल्याचे आमदार कीशोर पाटील यांनी सांगीतले.