<
मुंबई(प्रतिनिधी)- राज्यात आणि देशात उत्तम क्रिकेट खेळाडू निर्माण व्हावेत आणि त्यांनी आपल्या देशाचा नावलौकिक वाढवावा अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी क्रिकेटच्या विकासासंदर्भात मुंबई क्रिकेट असोसिएशनला राज्य शासन पूर्णपणे सहकार्य करेल अशी ग्वाही दिली. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यक्रमात आज मुख्यमंत्री बोलत होते.
वानखेडे स्टेडियम येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हस्ते, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत लिटल मास्टर सुनील गावस्कर यांच्या नावे “द सुनील गावस्कर हॉस्पिटॅलिटी बॉक्स” आणि माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या नावाने स्टेडियम मधील नॉर्थ स्टँडचे “दिलीप वेंगसरकर स्टँड” असे नामकरण करण्यात आले. यावेळी श्री. गावस्कर, श्री. वेंगसरकर यांच्यासह मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, माजी कर्णधार जी. आर. विश्वनाथ, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ विजय पाटील, उपाध्यक्ष अमोल काळे, सचिव संजय नाईक, सहसचिव शाहआलम शेख, खजिनदार जगदिश आचरेकर, टी२०- गव्हर्निंग काऊन्सिलचे चेअरमन मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, शाळेत असतांनाआम्हालाही क्रिकेटचे वेड होते, क्रिकेटर्सच्या चित्रांचे संग्रहही करायचो. माधव मंत्री यांचा माझा संबंध कधीही आला नाही पण हे सगळे क्रिकेटर्स बाळासाहेबांचे मित्र. क्रिकेट देशवासीयांच्या रक्तात आहे. क्रिकेटर व्हावे असे मला सुद्धा वाटत होते, पण त्याला तंत्र लागते, एकाग्रता आवश्यक आहे. वानखेडे स्टेडियमवर नाही पण ब्रेबोर्नवर रणजी सामने पाह्यला यायचो. स्वतःसाठी खेळणे वेगळे पण आपला अनुभव इतरांच्या कामी यावा असे वेंगसरकर, गावस्कर , सचिन यांना वाटते हे महत्वाचे आहे अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी प्रशंसा केली.