<
जळगांव(प्रतिनिधी)- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ संचलित कामगार कल्याण केंद्र तसेच कृती फाऊंडेशनच्या वतीने कामगार, त्यांचे कुटुंबिय व इतर गरजू नागरिकांसाठी आज कामगार कल्याण केंद्र, जोशी कॉलनी जळगांव येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले.
कामगार कल्याण केंद्राच्या वतीने कामगारांसाठी विविध सेवाभावी उपक्रम राबविले जातात. त्याचाच भाग म्हणून मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. यात एस पी ऑफिस वायरलेस विभागाचे पोलीस उपनिरीक्षक फारुख तडवी, संजय मराठे, कृती फाउंडेशन कार्याध्यक्ष व पोलीस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी, पत्रकार चेतन निंबोळकर, जिल्हा पोलीस दलातील संघपाल तायडे, कामगार कल्याण अधिकारी कुंदन खेडकर, केंद्र संचालक शेख रियाजोद्दीन सकाओद्दीन, गट समन्वयक भानुदास जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सर्व प्रथम आलेल्या मान्यवरांचे स्वागत सत्कार करुन शिबिराचे उदघाटन करण्यात आले. आजच्या धकााधकीच्या जीवनशैलीत अनेकांना मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या आजारांनी ग्रासले आहे. हे आजार झाल्यानंतर त्याचे परिणाम शरीराच्या इतर अवयवांवर होतात. मधुमेहाचा परिणाम सर्वात अगोदर डोळ्यांवर होतो. त्यामुळे डोळ्यांची निगा कशी राखायची याची माहिती नसल्याने अनेकांना अंधत्व आल्याचे निदर्शनास येते. हे आजार होऊ नये यासाठी कामगार कल्याण केंद्र व कृती फाऊंडेशनच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पुढे डोळ्यांचे आजार वाढू नये यासाठी मार्गदर्शन देखील करण्यात आले. या शिबिरात पुरुष, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नेत्र तपासणीचा लाभ घेतला.
सदर शिबिराला कृती फाउंडेशन, प्रभाकर पाटील नेत्र रुग्णालय, डॉ. चंदन चौधरी, शांताराम राखुंडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिबिराचे केंद्र संचालक शेख रियाजोद्दीन सकाओद्दीन यांनी प्रास्ताविक मांडले तर चेतन निंबोळकर यांनी आभार मानले. प्रसंगी कामगार कल्याण केंद्राचे कर्मचारी मीना शिंदे, सुमन जयस्वाल यांनी परिश्रम घेतले.