<
जळगाव(प्रतिनिधी)- वैद्यकीय आणि पोलीस क्षेत्रात समाजहितासाठी केलेल्या विशेष उल्लेखनिय कार्याचा गौरव म्हणून डॉ.श्रध्दा माळी, कृती फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष तथा पोलिस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी या दाम्पत्याना ३० रोजी सरस्वती प्रतिष्ठान जळगाव, सप्तरंग मराठी वाहिनीतर्फे हॉटेल प्रसिडेंट कॉटेज येथे खान्देश सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.
माझ्या नवर्याची बायको या मराठी मालिकेतील प्रसिध्द अभिनेता अभिजित खांडकेकर व किरण पातोंडेकर यांच्या हस्ते माळी दाम्पत्याना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ.श्रध्दा माळी, अमित माळी यांनी वैद्यकीय अन् सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल म्हणून त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
आरोग्यसेवेत ज्येष्ठ नागरीकांची मोफत आरोग्य तपासणी, व्यसनमुक्ती, निरक्षरता, हुंडाबळी, रक्तदान, देहदान, विद्यार्थी व्यक्तीमत्व कार्यशाळा, नेपाळमधील भुकंपग्रस्तांना मदत आदी सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले. तसेच कोरोना काळात गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूचे वाटपही केले. २५०० पेक्षा जास्त कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांनी सामाजिक चळवळीला बळ दिले आहे. यापूर्वीही त्यांना स्वामी विवेकानंद युवा प्रेरणा पुरस्कार, उमंग आदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आरोग्य, सामाजिक प्रबोधन, कार्यशाळा, पर्यावरण पूरक उपक्रम राबवून त्यांनी समाज कार्याचा वसा जपला आहे.
माळी दांम्पत्याचे कोविड काळातील कार्य कौतुकास्पद डॉ.श्रध्दा माळी, अमित माळी यांचे कोविड काळातील कार्य कौतुकास्पद असून त्यांनी कोरोनाकाळात आरोग्याबाबत विविध उपक्रम जिल्ह्यात राबविले. त्यात कोविडच्या पहिल्या लाटेची भीती नागरीकांमधून कमी करण्यासाठी त्यांनी समुपदेशन कार्यक्रमही राबविले.
लॉकडाऊनमुळे कामे बंद झाल्याने मोलमजुरी करून पोट भरणार्या मुजरांना दोन वेळच्या जेवणाची भ्रात होती. त्यांची चुल पेटत नव्हती. मात्र माळी दाम्पत्याना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी अशा कुटुंबाना जिल्हाभरात कोठेही उपासमार होऊ नये यासाठी जीवनावश्यक वस्तूच्या कीट वाटपाचा उपक्रम लॉकडाऊनकाळात हाती घेतला. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे जिल्हाभरातून कौतुक झाले.