<
जळगाव -(जिमाका)- आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जनतेच्या अपेक्षा वाढत आहे. जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करतांना शासकीय अधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय ठेवून कामांना गती देण्याबरोबरच संवेदनशील राहून नागरीकांची कामे करण्याचे आवाहन या सभेचे सहअध्यक्ष खासदार उन्मेश पाटील यांनी उपस्थितांना केले.
केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजनांची पूर्ततात करतांना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कामाची निकड व जनतेच्या भावना लक्षात घेऊन काम करावे. जिल्ह्यातील दळणवळणास चालना मिळावी, जिल्ह्यात रस्ते व रेल्वेचे जाळे निर्माण व्हावे यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय व राज्य महामार्गांची तसेच रेल्वेची कामे सुरु आहे. ही कामे तातडीने पूर्ण होण्यासाठी संबंधित यंत्रणेने काम करण्याची सुचना खासदार उन्मेश पाटील यांनी यावेळी केली. जिल्ह्यात दुध उत्पादन वाढावे याकरीता दुधाळ जनावरांच्या खरेदीसाठी तरुणांना मुद्रा योजनेतून कर्ज देण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्याच्या सुचनाही खासदार पाटील यांनी दिल्यात.
यावेळी खासदार पाटील यांनी जळगाव-चाळीसगाव, जळगाव-औरंगाबाद, जळगाव-धुळे, चाळीसगाव-नांदगाव या रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी नियोजन करावे, त्याचबरोबर जळगाव शहरातून जाण्याऱ्या राष्ट्रीय महामार्गाला समांतर रस्त्याचे काम सुरु करण्यासाठी महानगरपालिका व महावितरण कंपनीने इलेक्ट्रीक पोल, पिण्याचे पाण्याची व सांडपाण्याची पाईप लाईन शिफ्टींगचे नियोजन करावे, राष्ट्रीय महामार्ग विभागाने रस्त्यावरील खड्डे व साईडपट्टया तातडीने भरण्याचे काम करावे. जिल्ह्यात पंडित दिनदयाल उपाध्याय योजनेतंर्गत सुरु असलेली कामे तातडीने पूर्ण करा. प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत मंजूर घरकुलांची कामे तातडीने पूर्ण करा. घरकुलासाठी जागा उपलब्ध नसल्यास गावठाणामधील व शासकीय जागा उपलब्ध करुन देण्याबाबत गटविकास अधिकारी यांनी जागांचे सर्व्हेक्षण करावे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची कामे पूर्ण करणे, ग्रामपंचायतीमधील आपले सरकार सेवा केंद्रास आवश्यक सुविधा उपलबध करुन देणे, राष्ट्रीय ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतंर्गत सुरु असलेली कामे तातडीने पूर्ण करणे, विशेष सहाय योजनेतंर्गत ज्येष्ठ नागरीकांना अनुदानाचे वाटप वेळेवर करणे, रुरबन मिशनतंर्गत निवड झालेल्या कामांचा प्रकल्प आराखडा तयार करण्याच्या सुचनाही खासदार श्री. पाटील यांनी संबंधित यंत्रणांना दिल्यात.
यावेळी खासदार श्री. पाटील यांनी जळगाव व भुसावळ शहरात सुरु असलेल्या अमृत पाणीपुरवठा व मल:निस्सारण योजना, रेल्वे विभागामार्फत सुरु असलेली कामे, सर्व शिक्षा अभियान, शालेय पोषण आहार, योजना, म. गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आदि कामांचा आढावा घेतला.