<
नाशिक(जिमाका)- बचतगट व गटशेतीच्या माध्यमातून महिला शेतकरी व उद्योजकांनी विकास साधावा असे प्रतिपादन राज्याचे माजी सैनिक कल्याण व कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. आज पळसे येथील विविध विकास कामांचे भुमिपूजन व लोकार्पण तसेच नाशिक हनी बी फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून साकारलेल्या गोडवा गुळ निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन कृषि मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते संपन्न झाले त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी खासदार हेमंत गोडसे,आमदार, सरोज अहिरे, माजी आमदार योगेश घोलप, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, विभागीय अधिक्षक कृषि अधिकारी सुनिल वानखेडे, प्रकल्प संचालक, आत्मा राजेंद्र निकम, उपविभागीय कृषि अधिकारी गोकुळ वाघ, कृषी उपसंचालक, कैलास शिरसाठ, अध्यक्ष सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी, विलास शिंदे, सरपंच सुरेखा गायधनी, उपसरपंच दिलीप गायधनी, विष्णूपंत गायखे व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
यावेळी कृषी मंत्री दादाजी भुसे म्हणाले, गटशेतीच्या माध्यमातून आज गोडवा गुळ निर्मिती प्रकल्प उदयास आला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन थेट ग्राहकापर्यंत पोहचणे हाच या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. सेंद्रीय शेती व फार्मर प्रोड्यूसर कंपन्यांच्या सहकार्याने तरूण शेतकरी हे नक्कीच कारखानदार होतील यात शंका नाही. जुन्या काळचे तंत्रज्ञान व आधुनिक तंत्रज्ञान यांची योग्य सांगड घालून निर्मिती झालेला गुळ निर्मिती प्रकल्प हे उत्तम उदाहरण आहे. या प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून रसायन विरहित शुध्द गुळ ग्राहकांना उपलब्ध होणार असल्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
कृषी मंत्री भुसे पुढे म्हणाले की, शासनाकडून शेतकऱ्यांच्या सबलीकरणासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. यात विकेल ते पिकेल या योजनेद्वारे ज्या वाणास जास्त मागणी आहे त्या वाणाचे पीक शेतकरी आपल्या शेतात घेण्यासाठी कृषि विभागामार्फत प्रोत्साहित केले जात आहे. त्यांनी उत्पादीत केलेला माल थेट ग्राहकापर्यंत पोहचविण्यासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजना व फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या समन्वयातून शेतकऱ्यांसाठी बाजरपेठही उपलब्ध करून दिली जाते. महिला शेतकऱ्यांच्या विकासासाठी शासनाने 30 टक्के योजना या महिलांसाठी राखीव ठेवल्या आहेत. कृषि विभागाच्या माध्यमातून शेतात तयार झालेला माल एक्सपोर्ट, ग्रेडींग व पॅकींग करणे यासाठी शेतकरी बांधवांना प्रशिक्षण देण्यासाठी कृषि विभागाच्या तीनशे अधिकाऱ्यांवर राज्यात ही जबाबदरी सोपविण्यात आली आहे. या सर्वांचा शेतकरी व महिला शेतकरी यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांना केले