<
नाशिक(जिमाका)- स्वर्णिम विजय वर्षाच्या निमित्ताने देशाच्या चारही दिशांना निघालेल्या विजय मशाली 1971 च्या युद्धात शहीद जवानांच्या शौर्याची व भारताला मिळालेल्या विजयाची आठवण करून देतात. त्याचप्रमाणे ही विजय मशाल अखंडपणे प्रज्वलित राहून येणाऱ्या काळात नवसैनिकांना प्रेरणा देईल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
नाशिक येथील आर्टीलरी सेंटर येथे स्वर्णिम विजय वर्षाच्या निमित्ताने नाशिकमध्ये आलेल्या विजय मशालीच्या सन्मान व निरोप कार्यक्रमा प्रसंगी पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते.
या कार्यक्रमास राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सरोज अहिरे, तोफखाना कमांडन्ट ब्रिगेडियर एस. नागेश, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलिस आयुक्त दीपक पांण्डेय, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांच्यासह वरीष्ठ संरक्षण अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, 1971 साली भारत-पाकीस्तानमध्ये 13 दिवसांच्या युद्धानंतर 16 डिसेंबर 1971 रोजी पाकीस्तानने भारतासमोर आत्मसमपर्ण केले आणि दोन्ही देशांत युद्धबंदी करार झाला. आजही भारतीय सैनिकांच्या हिम्मत, धैर्य, शौर्य व बलिदानामुळे आज देशातील प्रत्येक नागरीक घरात सुरक्षित आहेत. 1971 च्या भारत पाकीस्तान युद्धातील भारताच्या विजयाला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गेल्या वर्षी दिल्लीहून निघालेली विजय मशाल कायमस्वरूपी अशीच तेवत राहून आपणा सर्वांना देशाच्या सुरक्षेसाठी प्रोत्साहित करीत राहील, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.
देशाचे सैनिक व शेतकऱ्यांप्रती बाळगवी संवेदनशिलता कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे म्हणाले, आपल्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात या विजय मशालीचे स्वागत व सन्मान करण्यात आला आहे. या मशालीच्या माध्यमातून देशाच्या सैनिकांप्रती आदर व्यक्त करण्याची संधी मिळाली हे आपले भाग्य आहे. देशाच्या संरक्षणासाठी सतत कार्यशील असणारे सैनिक आणि आपले शेतकरी बांधव यांच्याबाबत आपण सर्वांनी संवेदशीलता बाळगावी, असे आवाहन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी आज स्वर्णिम विजयी वर्षाच्या निमित्ताने विजय मशालीच्या भव्य निरोप समारंभा प्रसंगी केले आहे.