<
मुंबई(प्रतिनिधी)- भारतात रस्ते अपघातात बळी पडणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे रस्ते अपघातांविषयी समाजात आणि विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. या संदर्भात वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संस्था बहुमोल कार्य करीत असून त्यांनी अधिकाधिक लोकांना या कार्याशी जोडल्यास देशातील रस्ते अपघातांचे प्रमाण निश्चितपणे कमी होईल असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण सेवा संस्था यांच्या मानद शिक्षक व अधिकाऱ्यांनी कोरोना काळात राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल राज्यपालांच्या हस्ते त्यांचा राजभवन येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे आयोजन वाहतूक सुरक्षा दल (Road Safety Patrol) व महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशनतर्फे करण्यात आले होते.कार्यक्रमाला वाहतूक सुरक्षा दलाचे राज्याचे महानिदेशक अरविंद देशमुख, ठाण्याचे महानिदेशक तसेच महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशनचे राजदूत मणिलाल शिंपी, दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक किशोर पाटील व विविध जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण अधिकारी उपस्थित होते.
कोरोना काळात वाहतूक सुरक्षा दल, नागरी संरक्षण दल यांसह विविध क्षेत्रातील लोकांनी समाजासाठी हिरीरीने योगदान दिले. वाहतूक सुरक्षा दलाचे अधिकारी कुठलेही वेतन न घेता कार्य करीत आहेत ही कौतुकास्पद बाब असल्याचे नमूद करून संस्थेच्या समस्या सोडविण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करू, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.वाहतूक सुरक्षा ही जनतेची जबाबदारी आहे, हे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्याचे काम वाहतूक सुरक्षा दलातर्फे करण्यात येत असल्याचे सांगून अनेक शिक्षक हे कार्य विना मोबदला करीत असल्याचे महानिदेशक अरविंद देशमुख यांनी सांगितले.
सांगली, रत्नागिरी महापुराच्या काळात वाहतूक सुरक्षा व नागरी संरक्षण दलाच्या लोकांनी चांगले काम केल्याचे देशमुख यांनी सांगितले.राज्यपालांच्या हस्ते यावेळी अरविंद देशमुख, मणिलाल शिंपी, किशोर बळीराम पाटील, ज्ञानेश्वर बारकु म्हात्रे, यशवंत महादु सोरे, उद्योजक, मच्छिंद्रनाथ वाल्मिक कदम, माध्यमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद, नंदुरबार, रामचंद्र शांताराम देसले, समाजसेवक, अॅड. के.डी. पाटील, विभागीय समादेशक आर.एस.पी., बाळासाहेब बन्सी नेटके, मुख्य अग्निशामन अधिकारी, उल्हासनगर महापालिका, श्रीधर जयवंत पाटील तसेच ‘खाना चाहिए’, ग्रुप मुंबई, ‘जिझस ईज लाईफ फाऊंडेशन’, उल्हासनगर, ‘रोटी डे’ ग्रुप, कल्याण व ‘कच्छ युवक संघ’, कल्याण यांसह इतरांना सन्मानित करण्यात आले.