<
मुंबई(प्रतिनिधी)- कोरोनाच्या कठीण काळात डॉक्टर्सपासून वार्डबॉयपर्यंत, पोलीस शिपायापासून महासंचालकांपर्यंत, उद्योजकापासून ते सामान्य माणसापर्यंत सर्वांनीच निःस्वार्थपणे व सेवाभावाने काम केल्यामुळे तसेच कमी अवधीत देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण केल्यामुळे भारताने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
कोरोना काळात विशेषत्वाने कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींना राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी (दि. ८) राजभवन येथे ‘एन्जेल कम्युनिकेटर’ पुरस्कार प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.पब्लिक रिलेशन कौन्सिल ऑफ इंडियातर्फे आयोजित कार्यक्रमात राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, माजी खासदार प्रिया दत्त, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार, पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर व टाटा हॉस्पिटलचे कर्करोग तज्ञ डॉ.सुदीप गुप्ता व डॉ.शैलेश श्रीखंडे यांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
अभिनेते रोहिताश्व गौर, संपादक सुंदरचंद ठाकूर, डॉ.निर्मल सूर्य, डॉ.हरीश शेट्टी, रुबिना अख्तर हसन रिझवी, भारत मर्चंट चेंबरचे राजीव सिंघल, अजंता फार्माचे आयुष अगरवाल, कमल गुप्ता यांना देखील कोरोना काळातील कार्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाला पब्लिक रिलेशन कौन्सिलच्या मुंबई विभागाचे अध्यक्ष हुमायून जाफरी, सचिव हेमंत कुलकर्णी व इतर सदस्य उपस्थित होते.