<
नागपूर(प्रतिनिधी)- प्राणिजन्य आजारांमुळे भविष्यात कोविडसारखे संकट उद्भवण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे आजार वेळेत रोखण्यासह त्यांचा मानवाला संसर्ग होवू नये, यासाठी पशुवैद्यकशास्त्रात संशोधनाला चालना देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा महाराष्ट्र पशु व मत्स्य व्यवसाय विद्यापीठाचे प्रतिकुलपती सुनील केदार यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र पशु व मत्स्य व्यवसाय विद्यापीठाचा दहावा पदवीदान समारंभ श्री. केदार यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झाला. वैज्ञानिक व औद्योगिक विभागाचे सचिव तथा वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) महासंचालक डॉ. शेखर मांडे दूरदृश्य प्रणालीद्वारे या समारंभात सहभागी झाले होते. कुलगुरू कर्नल डॉ. आशिष पातुरकर, कुलसचिव सचिन कलंत्रे, अधिष्ठाता डॉ. एस. व्ही. उपाध्ये, डॉ. पी. टी. जाधव, डॉ. वासनिक आदी यावेळी उपस्थित होते.
ग्रामीण अर्थकारणात पशुपालन हा महत्वाचा घटक आहे. महात्मा गांधींनी मांडलेली ग्रामविकासाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी पशुसंवर्धन महत्वाचे ठरणार आहे. पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातून पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात संशोधन करून प्राणिजन्य आजार रोखण्यासोबतच पशुसंवर्धनासाठी उपयुक्त संशोधनावर भर द्यावा. ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणात पशुवैद्यकशास्त्राचे योगदान महत्वपूर्ण ठरणार असून यासाठी विद्यापीठाने नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा, असे श्री. केदार यांनी सांगितले.
जगभरात कोविडमुळे आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रत्येक घटक या महामारीमुळे प्रभावित झाला. प्राणिजन्य आजारामुळे मानवी जीवन मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाल्याची अशी अनेक उदाहरणे आहेत. यापुढेही अशी आव्हाने येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्राणिजन्य आजारांना रोखण्याच्या पूर्वतयारीमध्ये पशुवैद्यकशास्त्राची महत्वपूर्ण भूमिका राहणार असून पशुवैद्यकीय संशोधन हे मूलभूत विज्ञान, प्राणी आणि मानवी आरोग्याचा दुवा म्हणून काम करते, असे श्री. मांडे म्हणाले. कोविड काळात नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाने 25 हजार मानवी कोविड चाचण्या केल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली.
1253 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान- पदवीदान समारंभामध्ये 2018-19 व 2019-20 वर्षात पशुवैद्यक, मत्स्य विज्ञान तसेच दुग्ध तंत्रज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना, तसेच 2020-21 या सत्रातील मत्स्य विज्ञान व दुग्ध तंत्रज्ञान शाखेच्या एकूण 939 उमेदवारांना स्नातक, 275 उमेदवारांना स्नातकोत्तर आणि 39 उमेदवारांना आचार्य पदवी प्रदान करण्यात आली. तसेच विशिष्ट गुणवत्तेसाठी 59 सुवर्ण, 15 रजत पदके आणि प्रत्येकी 25 हजार रुपयांची दोन पारितोषिके वितरीत करण्यात आली. नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाची 2018-19 शैक्षणिक सत्रातील विद्यार्थिनी रितू पांघल हिने सात सुवर्ण आणि चार रजत पदके पटकाविली, तर मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयची विद्यार्थिनी नाम्बीर जासना सुरेश हिने 2019-20 वर्षामध्ये उत्तम गुणांकन प्राप्त करून पाच सुवर्ण पदके आणि एक रोख पारितोषिक पटकाविले.