<
जळगाव -(जिमाका)- तरुणांना रोजगार व स्वयंरोजगार उभारता यावे, याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांनी तरुणांना मुद्रा बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करुन दिल्यास जिल्ह्यात स्वयंरोजगार वाढीसाठी निश्चितपणे मदत होईल. याकरीता बँकांनी मदतीचे धोरण स्वीकारणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केले.
जिल्हा विकास समन्वय सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात श्रीमती खडसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर सभेचे सहअध्यक्ष म्हणून खासदार उन्मेश पाटील, जिल्हा परिषदेच्याअध्यक्षा श्रीमती उज्वलाताई पाटील, महापौर सिमाताई भोळे, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महापालिका आयुक्त डॉ. उदय टेकाळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील गायकवाड, सहायक प्रकल्प संचालक पी. पी. शिरसाठ आदि उपस्थित होते.
यावेळी बोलतांना खासदार खडसे म्हणाल्या की, शासनाच्या अनेक योजनांच्या लाभासाठी बँकेत खाते असणे आवश्यक आहे. नागरीकांना शासनाच्या योजनांच्या लाभासाठी बँकेत जावे लागते. नागरीक बँकेत गेल्यावर त्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. विशेषत: मुद्रा बँक योजनेतंर्गत कर्ज मागणीसाठी अर्ज केल्यानंतर तरुणांना आवश्यक ते मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. तसेच गरजूंना उद्योग व्यवसाय उभारणीसाठी कर्ज उपलब्ध झाल्यास ते इतरांनाही रोजगार उपलब्ध करुन देतील. याकरीता बँकांनी सहकार्याची भावना ठेवण्याचे आवाहन श्रीमती खडसे यांनी केले. त्याचबरोबर बॅकांना काही अडचण असल्यास त्या सोडविण्याचेही आश्वासन दिले.