<
आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. देशाच्या व राज्याच्या आर्थिक जडणघडणीत शेती क्षेत्राचा मोलाचा वाटा आहे. शेतीची संपूर्ण माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी गाव नमुना नंबर सातबारा हा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. घर जमिन असो की शेत जमीन या सर्वांची नोंद ही गाव नमुना नंबर सातबारा उताऱ्यावर केली. जमिनीवरील प्रत्येक नोंद या सातबारा उताऱ्यावर केली जाते. त्यामुळे खरेदी-विक्रीबरोबरच शेतकऱ्यांना पिक कर्ज, विमा योजना यासह शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सात-बारा उतारा आवश्यक असतो.
राज्याच्या महसूल विभागाने ई-फेरफार प्रकल्पांतर्गत सामान्य खातेदार व नागरिकांसाठी महाभूमी संकेतस्थळावर डिजिटल सातबारा उपलब्ध करुन दिला आहे. यापूर्वीचा सातबारा थोडासा किचकट स्वरुपाचा होता. मात्र, आताच्या डिजिटल सातबारामुळे शेतकऱ्यांना अधिक अचूक सातबारा मिळणार आहे. नव्या रुपातील या अद्ययावत उताऱ्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचावी, यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी मोफत सात-बारा वाटप मोहिम सुरू करण्यात आली आहे. याद्वारे राज्यात सुमारे 4 कोटी सात-बारा वाटप होणार आहे. तर ठाणे जिल्ह्यात सव्वा पाच लाख खातेदारांना शेती सातबारा मोफत मिळणार आहेत. महात्मा गांधी जयंतीपासून या मोहिमेची सुरूवात झाली आहे.
राज्य सरकारने सातबारा संगणकीकरणाचा कार्यक्रम 2008 मध्ये सुरू केला होता. जमिनीच्या संदर्भात जे 21 प्रकारचे वेगवेगळे नमुने आहेत, त्यातील सातबारा हा अत्यंत महत्वाचा प्रकार आहे. आजच्या आधुनिक युगात महसूल विभागानेही पुढाकार घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वसा हाती घेतला आहे. त्यामुळे महसूल विभागाचे अनेक उपक्रम हे डिजिटल होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे कागदोपत्री असलेले सात-बारा व आठ ई हे उतारे महसूल विभागाने ऑनलाईन उपलब्ध करुन दिले आहेत. हे सातबारा उतारे डिजिटल स्वाक्षरीसह पीडीएफ स्वरुपात उपलब्ध आहेत. अशा प्रकारचा प्रयोग करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
सातबारा डिजिटल करण्यामागचे महत्वाचे कारण म्हणजे शेतकऱ्याला राज्याच्या कानाकोपऱ्यातून एका क्लिकवर सातबारा उपलब्ध व्हावा हे आहे.शेतकऱ्यांना सातबारा डिजिटल सात-बारा काढण्यासाठी आता तलाठी कार्यालयांमध्ये ये-जा करण्याची गरज नाही. कारण ऑनलाइन डिजिटल पद्धतीने तुम्ही तुमचा सातबारा तुमच्या मोबाईलवर किंवा संकेतस्थळावर जाऊन काढू शकता. आणि तो तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सुद्धा वापरता येईल.
यासंबंधी महसूल विभागाने एक शासन निर्णयसुद्धा जारी केलेला आहे. त्यामुळे आता सर्व पतसंस्था असतील सर्व शासकीय कार्यालये आणि बँकांचे कार्यालय यामध्ये डिजिटल स्वाक्षरी चा सातबारा उतारा चालणार आहे. तसेच यापुढे सर्व शेतकऱ्यांना डिजिटल सातबारा उतारा सेतू मार्फत प्रत्येकाला दिला जाणार आहे.सात-बारा उताऱ्यामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.
पूर्वीपेक्षा सोप्या व सुटसुटीत पद्धतीत हा उतारा आता मिळणार आहे. यामध्ये क्यू आर कोड, राजमुद्रा असलेला हा नव्या स्वरूपातील हा बदलेला सात-बारा ऑनलाईन उपलब्ध असला तरी अद्याप सर्वच खेड्यांमध्ये किंवा ग्रामीण भागात ऑनलाईन उतारा काढण्याची सोय उपलब्ध होईलच असे नाही. तसेच नव्या स्वरुपातील सात-बारा उतारा कसा आहे, हे शेतकऱ्यांनाही कळावे, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील गावोगावी शेतकऱ्यांना मोफत सातबारा वाटप सुरू आहे. या उताऱ्यासोबत एक प्रतिसाद फॉर्म दिला जात आहे. यामध्ये आपल्या सात-बारा उताऱ्यात काही त्रुटी, दुरुस्ती असतील तर त्याची माहिती द्यायची आहे. त्यानुसार, नंतर त्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाने ही मोहिम सुरू केली आहे.
कोकण विभागात डिजिटल सात-बारा वाटप मोहिमेस गती ठाणे जिल्ह्यातील सुमारे 5 लाख 24 हजार 491 खातेदारांना शेतीचा सातबारा मोफत घरपोच देण्याची मोहिम सुरू केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.
ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण 6 लाख 45 हजार 171 इतके सातबारे असून त्यापैकी 5 लाख 4 हजार 91 शेतीचे सातबारा आहेत. यापैकी आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे सव्वा लाख सात-बारा उताऱ्याचे वाटप जिल्ह्यात झाले आहे. तर पालघरमध्ये 4,96,118 इतके सातबारा आहेत. रत्नागिरीमध्ये 20 लाख 22 हजार 678 सातबारा डिजिटल स्वरुपात उपलब्ध आहेत. तर रायगड जिल्ह्यात एकूण 11 लाख 52 हजार 621 सातबारा उतारे आहेत. त्यापैकी 9 लाख 89 हजार 663 उताऱ्यांचे वाटप करण्यात येणार असून आतापर्यंत सुमारे 90 हजार उताऱ्यांचे वाटप पूर्ण झाले आहे.
डिजिटल भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, ई-महाभूमी अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या आज्ञावलीमधून संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीने प्राप्त होणाऱ्या अधिकार अभिलेख विषयक शेतजमिनीचा सातबारा अद्ययावत उताऱ्याच्या प्रती गावामध्ये संबंधीत तलाठ्यामार्फत प्रत्येक खातेदारास घरोघरी जाऊन मोफत देण्याच्या दृष्टीने विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना मोफत सातबारा घरपोच वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तहसीलदारांना नियोजन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून तलाठ्यांमार्फत सातबारा वाटपास सुरूवात झाली आहे.
शेतकरी बांधवांनी या मोफत डिजिटल स्वाक्षरी सातबारा वाटप मोहिमेमध्ये सहभागी व्हावे. वाटप केलेल्या सातबारा मध्ये काही त्रुटी किंवा विसंगती असल्यास खातेदाराचा अभिप्राय घेऊन त्याची पूर्तता केली जाईल. जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नव्या स्वरुपातील डिजिटल सात बाराचे मोफत वाटप सुरू असले एका खातेदारास एकदाच हा सातबारा मोफत मिळणार आहे. त्यानंतर आवश्यक असल्यास ऑनलाईन पद्धतीने हा सातबारा आपल्याला काढता येणार आहे.
त्यासाठी bhulekh.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपल्याला डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा व 8 ई उतारा मिळविता येणार आहे. सर्वच शासकीय उपयोगासाठी हे डिजिटल स्वाक्षरी सात-बारा व 8 ई उतारे ग्राह्य धरले जात असल्याने प्रत्यक्ष कार्यालयात जाण्याची आवश्यकता उरली नाही. माहिती तंत्रज्ञानाचा या उपयोगाचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घेतल्यास त्यांचा वेळ व श्रम वाचणार आहेत.