<
जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- केंद्र सरकारच्या भारतीय डाक विभागातर्फे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी तसेच प्राविण्यधारक खेळाडूंकरीता विविध पदांच्या भरतीचा कार्यक्रम प्रसिध्द झाला आहे.
संबंधित खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी, जाहिरातीमधील अनुच्छेद 12 मधील 64 खेळ प्रकार पात्र असून या खेळ प्रकारातील फक्त भारतीय शालेय खेळ महासंघाने आयोजित केलेल्या शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सहभागी तसेच प्राविण्यधारक खेळाडू पात्र ठरणार आहेत. संबंधित खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे येथून प्रमाणित करुन देण्यात येणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील भारतीय डाक विभागाच्या भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या पात्र खेळाडूंचे अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव येथे स्वीकारुन प्रमाणित करण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे 22 नोव्हेंबर, 2021 पूर्वी पाठविण्यात येणार आहे. पात्र खेळाडूंची कामगिरी प्रमाणित करणारे विहित नमुन्यातील फॉर्म खेळाडूंनी बिनचूक जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव येथे सादर करावेत.
सदर प्रमाणपत्र प्रमाणित करण्याकरीता पुणे कार्यालयात जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव यांच्या कार्यालयामार्फत सादर करण्यात येईल. त्यानंतर क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे येथून पात्र खेळाडूंची कामगिरी प्रमाणित करणारे विहीत नमुन्यातील फॉर्म-4 प्राप्त झाल्यावर या कार्यालयामार्फत खेळाडूंना देण्यात येतील. खेळाडूंनी दिलेल्या नमुन्यात जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव यांच्या नावाने विनंती अर्ज व प्रमाणपत्राची सत्यप्रतीसह अचूक अर्ज 18 नोव्हेंबर, 2021 पूर्वी सादर करावे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.