<
जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमातंर्गत मतदार यादीची पडताळणी व दुरस्ती करुन ती त्रुटी विरहीत करण्याचा तसेच 1 जानेवारी, 2022 या अर्हता दिनांकानुसार नविन मतदार नाव नोंदणी करुन मतदार यादी सुधारीत करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
त्याअंतर्गत 16 नोव्हेंबर, 2021 रोजी जळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमासाठी एका विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे.
या विशेष ग्रामसभेमध्ये मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीची अस्तित्वात असलेली मतदार यादी ग्रामसभेमध्ये गावातील सर्व नागरिकांना पाहण्यासाठी/तपासण्यासाठी उपलबध करुन देण्यात येणार आहे. तसेच या मतदार यादीचे ग्रामसभेमध्ये वाचन करण्यात येणार आहे. ज्यांचे वय 1 जानेवारी, 2022 रोजी 18 वर्ष पुर्ण होत आहे. त्यांची नवीन मतदार म्हणुन तसेच लग्न होऊन गावात आलेल्या महिलांची नावनोंदणी करता येईल.
मतदार यादीमधील नोंदीबाबत नागरिकांना हरकती असल्यास/नाव नोंदीमध्ये दुरुस्ती असल्यास विहीत अर्ज भरुन घेण्यात येईल. गावातील मयत मतदार/कायम स्थलांतरीत मतदार/लग्न होऊन बाहेर गेलेल्या महिलांच्या नावाची वगळणी करता येईल. त्याचबरोबर दिव्यांग व्यक्ती (PWD) मतदार नावे मतदार यादीमध्ये चिन्हांकित करण्यात येतील.
तरी जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थांनी या विशेष ग्रामसभेत आपआपल्या गावांत सहभागी होवुन मतदार यादीतील नाव नोंदणी, नावाची दुरुस्ती तसेच आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करावी, असे आवाहन प्रविण महाजन, जिल्हा निवडणूक अधिकारी, जळगांव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.