<
नाशिक(जिमाका वृत्तसेवा)- कोरोना वाढला तर विकासकामांचा वेग रोखला जातो. त्यामुळे कोरोनाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. त्यासाठी नागरिकांनी कोरोना व लसीकरणाकडे दुर्लक्ष न करता जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्हा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
आज येवला तालुक्यातील न्याहारखेडे, नगरसुल व मातुलठाण येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी साहेबराव मढवई,पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, न्याहारखेडेच्या सरपंच कमलाबाई मोरे, नगरसुलच्या सरपंच मंदाकिनी पाटील, प्रकाश वाघ, तहसीलदार प्रमोद हिले, सहाय्यक अभियंता सागर चौधरी यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोरोनाच्या कालावधीत मागे पडलेली विकासकामे प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याने परिस्थिती पूर्व पदावर येत आहे. त्यामुळे अर्थचक्रासोबतच विकासकामांना गती प्राप्त होत असल्याचेही पालकमंत्री श्री. भुजबळ यावेळी सांगितले.मांजरपाडा प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात आले असून यावर्षी या भागात पाऊस कमी झाल्याने प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध झालेला नाही. या प्रकल्पातुन पाणी येण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
या विकास कामांचा झाला शुभारंभ- न्याहारखेडे येथील दिघवत पाटोदा सावरगाव नगरसुल वाईबोथी भारम रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग 68 मध्ये रस्त्याची सुधारणा करणे (अंदाजे किंमत 145.00 लक्ष), नगरसुल येथील प्रमुख जिल्हा मार्ग 79 येवला गणेशपूर (सुकी) हडपसावरगांव जायदरे ते प्रमुख जिल्हा मार्ग 70 व 162 मध्ये रस्ता रुंदीकरणासह मजबुतीकरण व डांबरीकरण करणे(अंदाजे किंमत 280.00 लक्ष), प्रमुख जिल्हा मार्ग 79 मध्ये येवला गणेशपूर (सुकी) हडपसावरगांव जायदरे ते प्रमुख जिल्हा मार्ग 70 व 162 रस्त्याची सुधारणा करणे (अंदाजे किंमत 250.00 लक्ष), प्रमुख जिल्हा मार्ग 79 मध्ये येवला गणेशपूर (सुकी) हडपसावरगांव जायदरे ते प्रजिमा 70, प्रजिमा 162 किमी रस्त्याची सुधारणा करणे (अंदाजे किंमत 120.00 लक्ष), उंदीरवाडी कोटमगाव नगरसुल कोळगाव ममदापूर 76 रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग 160 किमी रस्त्याचे मजबुतीकरण व रुंदीकरण करणे (अंदाजे किंमत 350.00 लक्ष) आणि मातुलठाण येथील मातुलठाण धामणगाव अंदरसुल ते प्रमुख जिल्हा मार्ग 80 व 162 मध्ये रस्ता रंदीरकरणासह मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (अंदाजे किंमत 360.00 लक्ष), गोपालवाडी (प्ररामा 8 ) अनकुटे धामोडे रामा 25 ते मातुलठाण सायगाव अंगुलगाव ते प्रमुख जिल्हा मार्ग 78 मध्ये रस्त्याचे रुंदीकरणासह मजबुतीकरण व डांबरीकरण करणे (अंदाजे किंमत 200.00 लक्ष) या विकासकामांचे भुमीपूजन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.