<
नवी दिल्ली- महाराष्ट्र राज्यात मागील दोन वर्षात ३ लाख ३० हजार कोटींचे औद्योगिक करार झाले असून गुंतवणूकदांरानी राज्याला प्रथम पसंती दर्शविली असल्याची माहिती आज राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्र दालनाच्या उद्घाटना प्रसंगी दिली.
40 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे आयोजन प्रगती मैदान येथे करण्यात आले आहे. या मेळ्यातील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री श्री.देसाई यांच्या हस्ते आज करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी व्यवस्थापकीय संचालक प्रवीण दराडे यांच्यासह महाराष्ट्र लघु विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.श्री.देसाई पुढे म्हणाले, मागील दोन वर्षात 2019-20 आणि 2020-21 या महामारीच्या कठीण काळातही राज्यात मोठी गुंतवणूक झाली आहे. जवळपास 3 लाख 30 हजार कोटी रूपयांचे औद्योगिक करार झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
या माध्यमाने राज्यात चांगल्या पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार असून याचा लाभ महाराष्ट्रातील नागरिकांना होईल. महाराष्ट्र राज्य हे औद्योगिकीकरणात नेहमीच पुढारलेले राज्य राहिले असल्याचा उल्लेख करीत, या औद्योगिक विकासाची घोडदौडची प्रगती मैदानाच्या महाराष्ट्र दालनातही दिसत असल्याचे श्री.देसाई यावेळी म्हणाले.
दालन राज्याच्या प्रगतीचा आरसा- महाराष्ट्राचे दालन कलात्मक आहे. दालन पाहिल्यानंतर त्यात महाराष्ट्र राज्याची छाप दिसते. संपूर्ण मेळ्यात महाराष्ट्राचे दालन आकर्षणाचे केंद्र दिसत आहे. राज्याची औद्योगिक प्रगती तसेच राज्यातील लघु उद्योग एकाच ठिकाणी मांडण्यात आले आहेत. इलेक्ट्रिकल वॅहिकेल उभे केले आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीचा आरसा हे दालन असल्याचे उद्योग मंत्री म्हणाले.