<
मानाचे वारकरी म्हणून श्री. कोंडीबा व सौ. प्रयागबाई टोणगे यांना शासकीय महापूजेचा मान
पंढरपूर(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यावर कृपादृष्टी कायम ठेवून राज्याची भरभराट करावी व राज्यातील शेतकरी व कष्टकरी यांना यश द्यावे. राज्यातील प्रत्येकाच्या घरात धनधान्य, सुख-शांती व समृद्धी नांदावी. राज्य, देश आणि जगातील कोरोनाचे संकट कायमचे दूर व्हावे, तसेच सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहण्याची महाराष्ट्राची परंपरा कायम रहावी, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री विठ्ठल चरणी घातले.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने श्री. पवार आणि सौ.पवार यांचा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी श्री. पवार बोलत होते. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जि. प.अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, सौ. सारिका भरणे, मानाचे वारकरी श्री. कोंडीबा देवराव टोणगे , सौ. प्रयागबाई कोंडीबा टोणगे, आमदार समाधान आवताडे, नगराध्यक्षा सौ. साधना भोसले आदी उपस्थित होते.