<
जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- मा. भारत निवडणूक आयोगाकडून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीची पडताळणी व दुरुस्ती तसेच 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकानुसार नव मतदारांची नाव नोंदणी करुन मतदार यादी सुधारीत करण्यात येत आहे. त्यासाठी 16 नोव्हेंबर, 2021 रोजी जळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या ग्रामसभेत सध्या अस्तित्वात असलेली मतदार यादी गावातील सर्व ग्रामस्थांना पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ज्यांचे वय 1 जानेवारी, 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण होत आहे. तसेच ज्यांची नावे अद्याप मतदार यादीत नोंदविलेली नाहीत त्यांची मतदार म्हणून नोंदणी करण्यात येईल. गावातील सर्व ग्रामस्थांना मतदार यादीमधील नोंदी तपासून दावे व हरकती घेता येतील.
तसेच गावातील मयत/ स्थलांतरीत/ दुबार मतदारांची नावे वगळणीबाबत कार्यवाही करण्यात येणार असून दिव्यांग तसेच अतिमहत्वाच्या व्यक्तींची नावे मतदार यादीमध्ये चिन्हांकीत करण्यात येणार आहेत. ग्रामपंचायत हद्दीतील सर्व मतदारांनी विशेष ग्रामसभेत सहभागी व्हावे, असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.