<
मालेगाव(उमाका वृत्त सेवा)- सुमारे एक हजार मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामासह प्रतितास 2 मेट्रिक टन क्षमतेचे धान्य चाळणी यंत्र उभारणी करुन तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम मालेगाव बाजार समितीमार्फत झाले आहे. ही बाजार समिती संपूर्ण राज्यात नावलौकिक मिळवेल असा विश्वास राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.
महात्मा ज्योतीबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या प्रवेशव्दाराच्या उद्घाटनासह गोदाम व चाळणी यंत्राचा लोकार्पण सोहळा मंत्री श्री.भुसे यांच्या हस्ते पार पडला यावेळी मंत्री श्री.भुसे बोलत होते.
यावेळी आमदार सुहास कांदे, उपमहापौर निलेश आहेर, सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनिल देवरे, प्रसाद हिरे, संजय दुसाणे, राजाराम जाधव, मधुकर हिरे प्रमोद शुक्ला यांच्यासह तालुक्यातील शेतकरी व बाजार समितीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन देतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, बाजार समितीमधील प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरणासह पावसाळ्यात पडणाऱ्या पावसामुळे पाणी आणि चिखलाचा निचरा होण्यासाठी कामे तात्काळ करणे गरजेचे आहे. त्यासाठी बाजार समितीने पाठपुरावा करावा. तालुक्याच्या इतरही भागांमध्ये बाजार समितीची व्याप्ती वाढवून शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासनही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिले.