<
जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- सावखेडा बु., ता. पाचोरा येथील वीरजवान मंगलसिंह जयसिंह परदेशी (वय 35) यांच्या पार्थिवावर आज सकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, राज्याचे जलसंपदा लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी परदेशी कुटुंबायांची घरी जाऊन भेट घेत त्यांचे सांत्वन केले.
जवान मंगलसिंह परदेशी यांना 14 नोव्हेंबर, 2021 रोजी पठाणकोट येथे कर्तव्यावर असताना छातीत गोळी लागल्याने वीरमरण आले. त्यांचे पार्थिव आज सकाळी सावखेडा येथे आणण्यात आले. त्यानंतर शोकाकूल वातावरणात आणि ‘जवान मंगलसिंह अमर रहे’च्या जयघोषात अंत्ययात्रा काढण्यात आली.
जवान मंगलसिंग परदेशी यांना त्यांचा सहावीतील 12 वर्षीय मुलगा चंदन याने अग्निडाग दिला. पिंपळगाव (हरे.) येथील पोलीसांनी बंदुकीच्या तीन फैरीची सलामी दिली. जवान मंगलसिंह यांच्यामागे आई-वडील, पत्नी किरण, मुलगा चंदन, मुली चंचल व कांचन असा परिवार आहे.जवान मंगलसिंग परदेशी यांना सुमारे 14 वर्षे सेवा केल्यानंतर नाईक पदावर पदोन्नती झाल्याने तीन वर्षं सेवेचे वाढवून मिळाले होते. सेवानिवृत्त होण्यासाठी सहा महिने बाकी होते.
जवान मंगलसिंग परदेशी यांच्या पार्थिवाचे आमदार किशोर पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, पोलिस उपअधीक्षक भारत काकडे, गटविकास अधिकारी अतुल पाटील, निवासी नायब तहसीलदार संभाजी पाटील, जिल्हा सैनिक कार्यालयाचे वेल्फेअर अधिकारी अनुरथ वाकडे, जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, दिपकसिंग राजपूत, मधुकर काटे, सेवानिवृत्त सैनिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळु पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्ष, संघटनांचे पदाधिकारी यांनी पुष्पचक्र अर्पण करून अंत्यदर्शन घेतले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.