<
नवी दिल्ली(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना आज राष्ट्रीय स्तरावरील सहकारी साखर कारखान्यांसाठी देण्यात आलेल्या पुरस्कारामंध्ये सर्वाधिक पुरस्कार मिळवून देशस्तरावर मोहर उमटवली आहे. आज वर्ष 2019-20 आणि 2020-21 च्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
येथील एपिडा सभागृहात राष्ट्रीय फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव शुगर फॅक्ट्रीज्स ली. च्या वतीने ‘दक्षता पुरस्कारा’चे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास केंद्रीय सहकार राज्यमंत्री श्री बी.एल. वर्मा, राज्यसभेचे ज्येष्ठ सदस्य शरद पवार, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, फेडरेशनचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, कार्यकारी संचालक प्रकाश नायकनवरे, यांच्यासह अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते.
वर्ष 2019-20 मध्ये एकूण 92 तर वर्ष 2020-21 मध्ये 108 साखर कारखान्यांनी पुरस्कारांसाठी भाग घेतला होता. कारखान्यांचे मूल्यमापन विविध निकषांच्या आधारावर करून पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. मुल्यमापनासाठी सरासरी दहा टक्के व त्याहून अधिक साखरेचा उतारा असलेले आणि दहा टक्क्यांपेक्षा कमी उतारा असलेले साखर कारखाने अशा दोन श्रेणींमेध्ये मूल्यमापन झाले होते.
केन डेव्हल्पमेंट पुरस्कार , तांत्रिक दक्षता पुरस्कार, आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार, सर्वाधिक केन क्रशिंग पुरस्कार, सर्वाधिक साखर वसुली पुरस्कार, उत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार, कमाल साखर निर्यात पुरस्कार अशी पुरस्कारांची विभागणी करण्यात आलेली आहे. पुरस्कार क्रमाक्रमाने केंद्रीय राज्यमंत्री , श्री पवार, श्री वळसे-पाटील, श्री टोपे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले.