<
मुंबई(प्रतिनिधी)- केंद्रीय गृह मंत्रालयाने स्थापन केलेल्या राष्ट्रीय सांप्रदायिक सद्भावना प्रतिष्ठान, नवी दिल्ली यांच्या वतीने 19 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत पाळण्यात येणाऱ्या कौमी एकता सप्ताहामध्ये ‘सांप्रदायिक सद्भावना मोहीम निधी संकलन सप्ताह’ साजरा होणार आहे.
या सप्ताहाअंतर्गत 25 नोव्हेंबर रोजी ‘ध्वज दिन’ साजरा करण्यात येणार असून ध्वजदिनाचा निधी संकलन करण्याकरिता व संकलित निधी सुपूर्द करण्याच्या कार्यपद्धतीसाठी शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे.25 नोव्हेंबर रोजी सर्व शासकीय कार्यालये, विद्यालये, महाविद्यालये, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे, सार्वजनिक संस्था आणि देणगीदार यांच्याकडून स्वेच्छेने निधी संकलित करण्यात यावा.
शासकीय कार्यालये, विद्यालये, महाविद्यालये, सार्वजनिक उपक्रम, महामंडळांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून हा निधी डब्यातून संकलित करण्यात यावा. खासगी संस्था वा देणगीदार अथवा करदाते यांच्याकडून ती रक्कम धनादेशाद्वारे स्वीकारावी. परिपत्रकासमवेतच्या पोच पावती नमुन्यावरच त्यांना पोच देण्यात यावी. खासगी संस्था वा देणगीदार अथवा करदाते यांच्याकडून “सचिव, राष्ट्रीय सांप्रदायिक सद्भावना प्रतिष्ठान, नवी दिल्ली” यांच्या नावे धनादेश घ्यावा.
जिल्हाधिकारी व मंत्रालयीन विभागांनी माजी सैनिक कल्याण मंडळे, रेड क्रॉस सोसायटी अथवा तत्सम संघटनांकडून निधी संकलनासाठी डबे उपलब्ध करुन घ्यावेत. संकलित निधी कार्यालयातील जबाबदार अधिकाऱ्यांसमोर मोजून त्याचा डिमांड ड्राफ्ट तयार करुन व अन्य संस्था, देणगीदारांकडून आलेले धनादेश “सचिव, राष्ट्रीय सांप्रदायिक सद्भावना प्रतिष्ठान, सी विंग, 9 वा मजला, लोकनायक भवन, खान मार्केट, नवी दिल्ली – 110003” यांच्याकडे नोंदणी टपालाद्वारे परस्पर पाठवावा किंवा संकलित निधी पुढील बँक खात्यावर हस्तांतर करुन त्याचा अहवाल अल्पसंख्याक विकास विभाग, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई – 32 या कार्यालयास 15 डिसेंबर, 2021 पर्यंत न चुकता पाठवावा, अशा सूचना देण्यात आल्या आहे.
यासाठी पुढील बँकाची नियुक्ती केली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, खान मार्केट, नवी दिल्ली, 110003
बँक खात्याचे नाव: नॅशनल फाऊंडेशन फॉर कम्युनल हार्मनी, खाते क्रमांक:. 1065439058, NEFT/IFSC/RTGS: CBIN0280310स्टेट बँक ऑफ इंडिया, निर्माण भवन, मौलाना आझाद रोड, नवी दिल्ली, 110011
बँक खात्याचे नाव : नॅशनल फाऊंडेशन फॉर कम्युनल हार्मनी, खाते क्रमांक.: 10569548047, NEFT/IFSC/RTGS: SBIN0000583बँक ऑफ इंडिया, खान मार्केट, नवी दिल्ली, 110003
बँक खात्याचे नाव : नॅशनल फाऊंडेशन फॉर कम्युनल हार्मनी, खाते क्रमांक.: 600710110006040, NEFT/IFSC/RTGS: BKID0006007
निधी संकलनासाठी महाराष्ट्र राज्य, नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 च्या नियम 11 मधील तरतूद शिथिल करुन निधी संकलीत करण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांस मुभा देण्यात आली आहे.
सर्व जिल्हाधिकारी आणि मंत्रालयीन विभागांचे सचिव यांनी या सूचनांप्रमाणे कार्यवाही करुन जास्तीत जास्त निधी संकलित करण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना देण्यात आल्या आहेत.