<
नवी दिल्ली(प्रतिनिधी)- महाराष्ट्राला सर्वाधिक स्वच्छ सर्वेक्षण वर्ष 2021 चे राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. सांगली जिल्ह्यांतील विटा नगरपालिकेला देशात प्रथम क्रमाकांचा तर पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि सासवड ने दुसरा व तीसरा क्रमांक प्राप्त करून देशात स्वच्छ सर्वेक्षणाचे सलग तीन पुरस्कार पटकावून महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
या तीन नगरपालिकांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आलेले आहे. यासह महाराष्ट्राने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशात दुसरा क्रमांक मिळविला आहे.
आज विज्ञान भवन येथे केंद्रीय गृहनिर्माण तथा नगर विकास मंत्रालयाच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण-2021 चे राष्ट्रीय पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी राष्ट्रपती राम नाथ कोविंद, केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास मंत्री हरदिप सिंग पुरी, केंद्रिय गृहनिर्माण तथा नगरविकास राज्यमंत्री कौशल किशोर, छत्तीसगड़ राज्याचे मुख्यमंत्री, मनीपुर राज्याचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास सचिव दुर्गा प्रसाद मिश्रा हे मंचावर उपस्थित होते