<
जळगांव(प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भीमाशंकर जमादार यांच्या सुचनेनुसार “हर घर दस्तक” या मोहिमेद्वारे ॲम्ब्युलन्स द्वारे तसेच सायंकाळी ४ वाजेपासून जामनेर तालुक्यात जि.प.सदस्य, नगरसेवक, पं.स. सदस्य, सरपंच ग्रामपंचायत सदस्य, बचत गट, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका तसेच सेवाभावी संस्था यांच्या सहकार्याने १९ व २० नोव्हेंबर रोजी तालुक्यात विशेष मोहिमेद्वारे कोरोना लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले.
तहसीलदार अरुण शेवाळे, गटविकास अधिकारी जे.व्ही.कवळ देवी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.विनय सोनवणे, डॉ. हर्षल चांदा यांनी दोन दिवशीय मोहिमेचे व पुढील आठवड्याचे नियोजन केले. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपालिका जामनेर, नगर पालिका शेंदूर्णी यांचे लसीकरण मोहिमेस अनमोल सहकार्य लाभत आहे.
ॲम्ब्युलन्स द्वारे गल्ली गल्लीत व प्रत्येक घरी लस उपलब्ध होत असल्याने तसेच सायंकाळी ४ वाजेपासून सत्र आयोजित केल्यामुळे लसीकरणास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच सुट्टीचा दिवस असून व वेळेची तमा न बाळगता आरोग्य विभाग कामकाज करीत असल्यामुळे नागरिकांकडून आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी तालुक्यातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण होण्यासाठी साठी केलेल्या कामकाजाचे जिल्हाआरोग्य अधिकारी यांनी विशेष कौतुक केले.