<
आज ५सप्टेंबर शिक्षकदिन! भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती. आज विविध शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालया मध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय. आज शिक्षकांवर त्यांच्या जीवनकार्यावर मोठ मोठे भाषण होतील. शिक्षकांचे महत्व सांगितले जाईल, पण हे किती वेळेपर्यंत. असो! काल सहज रिकाम्या वेळात व्हाटसप पाहत होतो, एक-दोन नाही तर तब्बल सात-आठ व्हाटसप गृपला एक पोस्ट वाचण्यात आली, आणि वाचून थोडं दुःख झालं. पोस्ट होती “तुमच्यासाठी शासनाने नेमून दिलेले तुमचे नोकर” आणि त्यात एक नाव होतं शिक्षक! शिक्षक आणि नोकर? पुराणात गुरुंची केवढी मोठी महिमा वर्तवली आहे. एवढं गुरुचं महात्म्य आणि मग एवढी विसंगती कशी? पुर्वी देव स्वरूप आणि आता नोकर? एवढी पातळी घसरली शिक्षकांची? नक्कीच नाही. कारण शिक्षक हा कधीच त्याच्या विद्यार्थ्यांचं वाईट चिंतत नाही. मि घडवीत असलेला विद्यार्थी हा जिवनात यशस्वी व्हावा, त्याने आयुष्यात खुप प्रगती करावी हा एकच ध्यास शिक्षकांचा असतो. म्हणूनच तर शिक्षकाला विद्यार्थी जिवनाचा शिल्पकार म्हटलं आहे. आज मोठ मोठे हुद्द्यावर असलेले अधिकारी, पदाधिकारी कोणामुळे झाले? तर याचं उत्तर हे शिक्षक मिळेल.
अशा या भावीपीढीच्या शिल्पकाराचे समाजात काय स्थान आहे? ते काय असावे? याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आज कोणतीही शैक्षणिक योजना मोहीम असो वा शासनाची कोणतीही योजना असो, ती राबवण्यासाठी, यशस्वी करण्यासाठी शासन शिक्षकांची मदत घेतं. परवा पंढरपूरची एक बातमी वाचली “शिक्षकांना दिला ग्रामसेवकांचा चार्ज” यावरुन एक गोष्ट सिद्ध होते, कि शिक्षकांवर असलेल्या शासनाचा विश्वास दुसरं म्हणजे शिक्षकांचे अष्टपैलूत्व. एवढं असूनही आज समाजाचा शिक्षकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत नाही. त्यांना फक्त शिक्षकांचा पगार दिसतो, त्यामुळेच समाज शिक्षकांप्रती उदासीन आहे. विविध गोष्टींच खापर शिक्षकांवर फोडलं जात आहे. शिक्षक हा शेवटी मानवचं! एखादा शिक्षक हा चुकतही असेल, पण समाजाचं सर्व शिक्षकांवर खापर फोडणं कितपत योग्य? समाजाची ही भावना कुठंतरी बदलायला हवी.आज शिक्षक दिनी आम्हा शिक्षकांची ग्रामस्थांकडून एकच माफक अपेक्षा असते की, गावातील शाळेतील शिक्षकांना “फुल ना फुलाची पाकळी” देऊन शुभेच्छा देणे. पण हे किती गावांमध्ये घडतयं? तरीही शिक्षक आपण घेतलेला शिक्षणाचा वसा अविरतपणे पुढे नेतोय. हे चित्र बदललं, समाजाची मानसिकता बदलली तर खऱ्या अर्थाने शिक्षक स्वतःला धन्य समजेल. आज मला जे भावलं ते मी लिहीलं. आजच्या दिवशी माझ्या सारख्या शिक्षणाचा वसा घेतलेल्या सर्व शिक्षक बंधू-भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
-संजय पोपट गायकवाड उपशिक्षक जि.प.प्राथमिक शाळा, मुसई खु. ता.धरणगांव,जि.जळगांवमो.नं.- ९८५०५९६९२९
Very Nice…