<
नवी दिल्ली- हळद, बेदाना, मसाले, चामड्याची उत्पादने, बांबू फर्निचर, पैठणी साड्या, कोल्हापुरी चप्पल आदी महाराष्ट्रातील लघु उद्योजकांच्या उत्पादनांना राजधानीत सुरु असलेल्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात (आयआयटीएफ) देश-विदेशातील ग्राहकांची खास पसंती मिळत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या लघु उद्योग विकास महामंडळाच्यावतीने प्रगती मैदान येथील हॉल क्र. २ मध्ये राज्याचे विद्युत वाहन धोरण, राज्यातील महत्त्वाचे प्रकल्प, स्टार्टअपची विविध उत्पादने व हस्तकला उत्पादनांनी सज्ज व सुबक असे महाराष्ट्र दालन साकारण्यात आले आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या भारत व्यापार प्रोत्साहन संस्थेच्यावतीने (इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायजेशन)४०व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे आयोजन केले असून येथे भेट देणाऱ्या देश-विदेशातील ग्राहकांना महाराष्ट्र दालन आकर्षित करीत आहे.
राज्य शासनाच्या पुढाकारातून देश-विदेशात सांगलीची उत्पादने महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्याच्या वांगी येथील लालासो भोसले यांचा हळदी, बेदाना आणि मिरचीपूड ही उत्पादने असलेल्या स्टॉलवर ग्राहकांची एकच गर्दी दिसते. रास्त दरात गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळत असल्याचा आनंद या स्टॉलहून उत्पादने खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी बोलून दाखवला. या स्टॉलचे प्रमुख लालासो भोसले गेल्या चार वर्षांपासून या मेळाव्यात येत आहेत व राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या संधीमुळे देश-विदेशातील ग्राहकांपर्यंत आपली उत्पादने पोहोचत असल्याचे समाधान त्यांनी बोलून दाखविले.