<
मुंबई(प्रतिनिधी)- इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी आज ७३२ कोटी रूपये वितरित करण्यात आले आहेत.तर ऑक्टोबर २०२१ पर्यंत ७३२ कोटी रूपये यापूर्वीच वितरित करण्यात आले होते. त्यामुळे सन २०२१-२२ या वर्षासाठी शंभर टक्के निधी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी वितरित करण्यात आला आहे, अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती सन २०२१-२२ या वर्षासाठी १४६४ कोटी रूपये इतका निधी अर्थसंकल्पित केला होता. त्यापैकी ऑक्टोबर २०२१ पर्यंत ५० टक्के निधी ७३२ कोटी रूपये वितरित करण्यात आला होता. इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उर्वरित निधी वितरित करण्याबाबत विनंती केली होती.
दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ रोजी एकूण अर्थसकंल्पीत १४६४ कोटीमधील उर्वरित ५० टक्के रक्कम ७३२ कोटी रूपये रक्कम वितरित करण्यात आली आहे. अशा प्रकारे अर्थसंकल्पीत मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठीची २०२१-२२ या वर्षासाठीची शिष्यवृत्तीची रक्कम शंभर टक्के वितरित करण्यात आली आहे.