<
अमळनेर : ‘काळ आला होता पण, वेळ आली नव्हती’ या म्हणीची प्रचिती काल रात्रीच्या सुमारास तालुक्यातील गलवाडे गावातील पांचाळ कुटुंबियांना आली. ट्रकचे स्टेअरिंग लॉक झाल्याने रात्री झोपलेल्या पांचाळ कुटुंबियांच्या अवघ्या चार फुटाच्या अंतरावर ट्रक पलटी झाला, मात्र सुदैवाने संपूर्ण कुटुंब वाचले.
झाले असे की, २३ रोजी रात्री १ ते १.३० च्या सुमारास नरडाणाहून पारोळाकडे एम.एच. ४६ ए.आर. ७४३४ क्रमांकाचा सिमेंटचा माल भरलेला ट्रक गलवाडेमार्गे जात होता. मात्र गलवाडे बसस्थानकालगतच रस्त्याच्या पलिकडे वास्तव्यास असलेले गोरख गुलाब पांचाळ (३०), गंगाबाई गुलाब पांचाळ (५५), दशरथ गुलाब पांचाळ (२४), रिता गोरख पांचाळ (२५) आदी उज्ज्वला, तनु आणि विशाल या लहान बालकांसमवेत हे कुटुंब रस्त्यालगतच्या नाल्यावरील ढाप्यावर झोपलेले होते.
ट्रकचे स्टेअरिंग लॉक झाल्याने चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि ज्या ढाप्यावर पांचाळ कुटुंब झोपलेले होते त्या ढाप्याला ट्रक जावून धडकला आणि अवघ्या चार फुटाच्या अंतरावर पलटी झाला. अचानक झालेल्या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबाने स्वत:ला सावरत घराकडे धाव घेतली. असे म्हणतात ना, काळ आला होता पण वेळ आली नव्हती.