<
मुंबई(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या अध्यक्षपदी विधानपरिषद सदस्य डॉ. वजाहत मिर्झा अथर मिर्झा यांची बिनविरोध निवड झाली. त्यांना अध्यक्षपदी निवडून आल्याबाबतचे प्रमाणपत्र अल्पसंख्याक विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी यांनी आज मंत्रालय येथे प्रदान केले.राज्याचे अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्री नवाब मलिक यांनी डॉ. वजाहत मिर्झा अथर मिर्झा यांचे निवडीबद्दल अभिनंदन केले.
मंडळावर सद्यस्थितीत १० सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर मंडळासाठी पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. आता अध्यक्षपदाचीही निवड झाल्याने वक्फ मंडळ आता संपूर्ण क्षमतेने कामकाज करु शकेल. मंडळाच्या तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा अथर मिर्झा यांना पुढील वाटाचालीसाठी शुभेच्छा देतो, अशी प्रतिक्रिया मंत्री श्री. मलिक यांनी व्यक्त केली.
वक्फ अधिनियम 1995 या केंद्र शासनाच्या कायद्यानुसार महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. मंडळावर सद्यस्थितीत 10 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिनियमातील तरतुदींप्रमाणे मंडळाच्या अध्यक्ष निवडीसाठी आज 26 नोव्हेंबर 2021 रोजी बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ (निवडणूक घेणे) नियम 2000 मधील तरतुदीनुसार अपर मुख्य सचिव तथा सक्षम अधिकारी जयश्री मुखर्जी यांच्यामार्फत त्यांच्या दालनात निवडणूक घेण्यात आली. नियोजित वेळेत डॉ. वजाहत मिर्झा अथर मिर्झा या एकाच सदस्याकडून नामनिर्देशन प्राप्त झाल्याने व हे नामनिर्देशनपत्र वैध ठरल्याने डॉ. वजाहत मिर्झा अथर मिर्झा हे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आले असल्याची घोषणा करण्यात आली.