<
जळगाव(जिमाका वृत्तसेवा) जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जळगाव या कार्यालयामार्फत jalgaon.nic.in या संकेतस्थळावर जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित मुलां-मुलींचे बालगृह/निरीक्षणगृह जळगाव या संस्थेतील रिक्त पद भरतीसाठी पात्र-अपात्र संभाव्य उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यावर लेखी हरकती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होते.
मात्र, असे निदर्शनास आले आहे, की कुणीतरी बाह्य अज्ञात व्यक्तीव्दारे उमेदवारांना मोबाईलव्दारे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जळगाव व जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव या कार्यालयांच्या नावे परस्पर संपर्क करुन फसवणूकीच्या उद्देशाने पैसे दिल्यास काम करुन देतो, असे सांगून उमेदवारांना ऑनलाईन पैसे टाकण्यास सांगण्यात येत आहे.
संबंधित उमेदवार, त्यांच्या नातेवाईकांनी अशा प्रकारच्या अमिषांना कुणीही बळी पडू नये. सदर भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी व गुणवत्तेच्या निकषानुसार केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय (प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, आकाशवाणी चौक, जळगाव, दूरध्वनी क्रमांक : 0257-2228828 ) येथे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.