<
पुणे(प्रतिनिधी)- शेतमालाला केवळ हमीभाव नाही तर हमखास भाव मिळण्यासाठी शासनाने सुरू केलेले ‘विकेल ते पिकेल’ अभियान शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरते आहे. जिल्ह्यात या अभियानाने 1 हजार 245 ठिकाणी शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्रीव्यवस्था उभी केली आहे. शेतकऱ्यांना या विक्री व्यवस्थेने चांगलाचा आत्मविश्वास दिला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या हस्ते 10 सप्टेंबर 2020 रोजी या महत्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ झाला. शेतमाल विकण्यासाठी स्थानिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, जागतिक बाजारपेठेत मागणी असलेल्या व ज्यापासून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळेल अशी पीकपद्धती व शेतीपद्धतीची पूर्नमांडणी करणे हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे.
अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यात संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान सुरु करून शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्था उभी केली आहे. आज अखेर 1 हजार 352 ठिकाणे निश्चित करुन 1 हजार 245 ठिकाणी प्रत्यक्ष विक्री सुरु आहे.शेतमाल विक्रीची सुविधा झाल्याने शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेल्या उत्पादनाला चांगला दर मिळण्यासोबतच ग्राहकांनादेखील चांगल्या प्रतीची उत्पादने मिळत आहेत.
या व्यवस्थेने शेतकरी व ग्राहक दोघांनाही फायदा झाला आहे. शिवाय शेतकऱ्यांना बाजारात मागणी असलेली उत्पादने शेतात पिकविण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. या अभियानामुळे ताज्या भाजीपाल्यासह धान्य व कडधान्ये ग्राहकाला आपल्या परिसरात उपलब्ध आहेत.