नाशिक(जिमाका वृत्तसेवा)- मतदान केंद्राचे अधिकारी हेच निवडणूक यंत्रणेचा मुख्य कणा असून, त्यांचे योगदान लक्षात घेवून त्यांच्या कार्याची दखल घेणे आवश्यक आहे. मतदान जागृती मंचाच्या माध्यमातून व्यापक प्रमाणावर जनजागृती होईल असा विश्वास मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केला आहे.
आज ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ठिकाणी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय व जिल्हा निवडणूक यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित मतदार जागृती मंचाचे उद्धाटन मतदान केंद्र अधिकारी नितिन जोशी यांच्या हस्ते जाणीवपूर्वक करण्यात आले.
यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, उपजिल्हाधिकारी (रोहयो) नितिन मुंडावरे, निवडणूक उपजिल्हा अधिकारी स्वाती थविल,तहसिलदार प्रशांत पाटील, मतदान केंद्र अधिकारी नितिन जोशी यांच्यासह सर्व मतदान केंद्र अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे म्हणाले की, या संमेलनात प्रथमच अशा प्रकाराच्या मंचाचे आयोजन करण्यात आले असून, मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती होणे हाच महत्वाचा उद्देश आहे. या मंचाच्या माध्यमातून मतदानाबाबत माहिती असणारे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे व्यासपीठे, शाळा- महाविद्यालये, गाव-परिसरांमध्ये, कार्यालयामध्ये स्थापन करण्यासंबंधीची मार्गदर्शक पुस्तिकाही या दालनात उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने जागृती मंचास भेट द्यावी, असे आवाहनही मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी यावेळी केले आहे.