<
नाशिक(प्रतिनिधी)- केंद्र सरकारने 2004 साली भाषांना ‘अभिजात’ भाषेचा दर्जा बहाल करण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यानुसार मराठीला अभिजात दर्जा द्यावा अशी लेखी शिफारस केंद्र सरकारने नेमलेल्या भाषातज्ज्ञांच्या समितीने एकमताने केलेली आहे. मराठी प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा, महानुभावी धर्मभाषा आणि लोकभाषा म्हणून जागतिक भाषांमधली अग्रणी भाषा आहे.
या संदर्भातील अनेक पुराव्यांनी सिध्द झाले आहे की, मराठी ही अभिजात भाषा आहे. तरी कृपया मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी विंनती यावेळी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई व राज्याचे अन्न, नागरी पुरवठी व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ पत्राद्वारे राष्ट्रपतींना केली आहे. तसेच या दालनास भेट देणाऱ्या प्रत्येकाने या पत्रावर स्वाक्षरी करुन राष्ट्रपतींना मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत विंनती करावी, असे आवाहनही यावेळी श्री. देसाई यांनी केले आहे.
संमेलनाच्या निमित्ताने राज्य मराठी विकास संस्थेने ‘शांतता मराठीचे कोर्ट चालू आहे’ या लघुपटाची निर्मिती केली असून यावेळी लघुपट दाखविण्यात आला. यामध्ये एक अभिरुप न्यायालय अशी संकल्पना करण्यात आली असून यात वादविवाद आणि संवादांच्या माध्यमातून जनतेपर्यंत मराठी भाषा विभागाचे म्हणणे मांडण्यात आले आहे.मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई व राज्याचे अन्न, नागरी पुरवठी व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी संपूर्ण अभिजात मराठी दालनाला भेट दिली.