<
मुंबई(प्रतिनिधी)- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६५ वा महापरिनिर्वाण दिन येत्या सोमवारी म्हणजेच दिनांक ६ डिसेंबर २०२१ रोजी आहे. दरवर्षी ६ डिसेंबर रोजी महानगरपालिकेच्या ‘आर मध्य’ विभागाच्या कार्यक्षेत्रात असणा-या ‘ग्लोबल पॅगोडा’, गोराई येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी येत असतात.
मात्र, ‘कोविड – १९’ (ओमिक्रॉन नवीन विषाणू प्रजाती) या संसर्गजन्य आजाराच्या प्रादुर्भावाची संभाव्यता लक्षात घेता, खबरदारीची उपाययोजना म्हणून दिनांक ५ ते ७ डिसेंबर २०२१ दरम्यान ‘ग्लोबल पॅगोडा’ बंद ठेवण्यात येणार आहे. तरी, अनुयायांनी दिनांक ५ ते ७ डिसेंबर २०२१ दरम्यान ग्लोबल पॅगोडा येथे येऊ नये आणि कोरोना (ओमिक्रॉन नवीन विषाणू प्रजाती) संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका उप आयुक्त (परिमंडळ – ७) डॉ. (श्रीमती) भाग्यश्री कापसे व ‘ग्लोबल पॅगोडा’चे प्रतिनिधी यांनी संयुक्तपणे केले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘आर – मध्य’ विभाग कार्यालयात विविध संघटनांसमवेत एका विशेष बैठकीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. उप आयुक्त (परिमंडळ – ७) डॉ. (श्रीम.) भाग्यश्री कापसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीला ‘आर मध्य’ विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. हफीज वकार जावेद मन्सुर अली, ‘ग्लोबल पॅगोडा’ चे व्यवस्थापक श्री. एस. एस. शिंदे, संबंधीत पोलिस निरिक्षक श्री. रविंद्र आव्हाड, पोलिस उप निरिक्षक (वाहतूक) श्री. संजय सावंत, विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. निवृत्ती गोंधळी यांच्यासह महापालिकेचे संबंधीत अधिकारी आणि ‘ग्लोबल पॅगोडा’ चे प्रतिनिधी उपस्थित होते.
वरीलनुसार आयोजित बैठकी दरम्यान ‘कोविड – १९’ चा प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीची उपाययोजना म्हणून यावर्षी रविवार, दिनांक ५ डिसेंबर २०२१ ते मंगळवार, दिनांक ७ डिसेंबर २०२१ या तीन दिवसांच्या कालावधी दरम्यान ‘ग्लोबल पॅगोडा’ बंद ठेवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. तरी, कृपया अनुयायांनी या तीन दिवसांदरम्यान ‘ग्लोबल पॅगोडा’ येथे प्रत्यक्ष न येता, आपापल्या घरुनच अभिवादन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.