<
जळगाव(जिमाका वृत्तसेवा)- महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत जळगाव जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट प्रकारच्या घरकुलांची निर्मिती करावी. राज्य शासनाचे महत्त्वकांक्षी असलेले हे अभियान राबविण्यात जळगाव जिल्हा राज्यात आघाडीवर राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. अभियान यशस्वीतेसाठी शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले
महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत सर्वांसाठी घरे-2022 या उपक्रमांतर्गत येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कार्यशाळा ऑनलाईन संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते.
या कार्यशाळेस जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज अशिया, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक मीनल कुटे, जिल्हा परिषदेचे प्रमुख अधिकारी, गटविकास अधिकारी उपस्थित होते. कार्यशाळेस खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पालकमंत्री पुढे म्हणाले की, जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्ह्यातील पात्र घरकुल लाभार्थ्यांना लाभ द्यावा. ज्या गावांमध्ये घरकुलासाठी जागा उपलब्ध नाहीत अशा पात्र लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे. जेणेकरून हे अभियान यशस्वी होईल. तसेच ज्याठिकाणी घरकुलासाठी जागा उपलब्ध नाही त्याठिकाणी गावठाण, गायरान व शासकीय जमिनी उपलब्ध असतील त्याठिकाणची जमीन उपलब्ध होण्यासाठी कार्यवाही करावा. कमी जागा असेल अशा ठिकाणी अपार्टमेंटचा विचार करावा. शासनाच्या वतीने सर्वोतोपरी सहकार्य यासाठी करण्यात येऊन प्रशासनाने घरकुलांचे कामे वेळेत पूर्ण करण्यासाच्या सूचनाही मंत्री पाटील यांनी दिल्या.
या अभियानात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन हे अभियान जिल्ह्यात यशस्वीपणे राबवावे, हे अभियान राबविण्यात जळगाव जिल्हा राज्यात आघाडीवर राहण्यासाठी हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना यावेळी केले. जिल्ह्यात जी घरकुल पूर्ण झाली आहेत त्यांना स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालय, सौभाग्य योजनेअंतर्गत विद्युत जोडणी, उज्व्ीला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन तर जलजीवन मिशन अंतर्गत नळजोडणी देण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
या अभियानाअंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्यांची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जळगाव जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असून या अभियानाअंतर्गत घरकुल बांधताना कुणालाही, कुठल्याही प्रकारची अडचण येत असल्यास त्वरित निदर्शनास आणून द्याव्यात. जेणेकरून त्या त्वरीत सोडविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी सर्व गटविकास अधिकारी यांना सांगितले.
तसेच उद्दिष्ट अधिक असले तरी एकमेकांच्या सहकार्याने ते पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले. महाआवास अभियानाअंतर्गत प्रलंबित घरकुले 4020 इतके आहेत. ते पूर्णकरण्यासंदर्भात जनजागृतीकरुन घरकुल पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त करण्याची योजना असुन 11 डिसेंबर रोजी लोकअदालतद्वारे लाभार्थ्यांना घरकुल पूर्ण करण्यासाठी, प्रवृत्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
घरकुलांची गुणवत्ता सुधारण्यसाठी व लाभार्थ्यांना मार्गदर्शक ठरावे या करिता मागील महा आवास अभियानांत 15 तालुक्यामध्ये 15 डेमो हाऊस बांधण्यात आलेले होते. तसेच या महाआवास अभियानात जिल्हास्तरीय डेमो हाऊस बाधून डेमो हाऊसमध्ये माहिती कक्ष माहिला स्वयं सहायता गट यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था शेतकरी उत्पादन कंपनी इ.सहकार्यातून कॉप सुरु करण्यात येणार आहे
ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या अंमलबजावणी मध्ये गतिमानता व गुणवत्ता येण्यासाठी महाआवास अभियानात प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये किमान एक प्रमाणे बहुमजली गृहसंकुले उभारणे भूमिहिन लाभार्थ्यांना घरकुल बांधकामाकरिता जागा उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विविध मार्गांनी उपलब्ध होणाऱ्या लॅण्ड बँकची निर्मिती करणे 10 टक्के घरकुल बांधकामामध्ये फरशी रंगरंगोटी किचन गार्डन पारसबाग रेनवॉटर हार्वेस्टींग सौर उर्जा नेट बिलींग इ.वापर करुन आदर्श घरकुल तयार करणे.
जलजीवन मिशन अंतर्गत नळाने शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे, गॅस जोडणी साठी प्रधानमंत्री उज्जवला योजना विद्युत जोडणी उर्जेच्या बचतीसाठी महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण इ. शासकीय योजनांशी कृतिसंगम करणे बाबत या महाआवास अभियानात समावेश करण्यात आला आहे, यावेळी या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यास राज्य शासनाद्वारे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, याबाबत सविस्तर माहिती श्रीमती कुटे यांनी दिली.