<
नवी दिल्ली- अपंगत्वावर मात करून आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलेल्या महाराष्ट्रातील 10 दिव्यांगाना वर्ष 2020 च्या राष्ट्रीय सक्षमीकरण या राष्ट्रीय पुरस्काराने आज राष्ट्रपती राम नाथ कोविंद्र यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यासह दिव्यांगांच्या सुगम्यतेसाठी नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागालाही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.विज्ञान भवन येथे आज ‘आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवसा’निमित्त केंद्रीय सामाजिक आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने ‘राष्ट्रीय सक्षमीकरण पुरस्कार’ वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रपती, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री विरेंद्र सिंह, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्रीव्दय रामदास आठवले, श्रीमती प्रतिमा भौमिक, सचिव अंजली भावड़ा, उपमहानिदेशक किशोर सुरवाडे उपस्थित होते.
यावेळी एकूण 59 व्यक्तींना तसेच शासकीय अशासकीय संस्थांना विविध श्रेणीतील पुरस्काराने गौरिविण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील 10 व्यक्ती तसेच नाशिक सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा समावेश आहे. मूळची महाराष्ट्राची सध्या दिल्लीत वास्तव्यास असलेली देवांशी जोशी यांनाही आज राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सन्मान स्वरूपात सन्मानपत्र, पदक, आणि काही पुरस्कार प्राप्त व्यक्तींना रोख रक्कम देण्यात आलेली आहे.महाराष्ट्रातून राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त व्यक्तींमध्ये चलन अक्षमता (महिला) श्रेणीमध्ये उत्कृष्ट कर्मचारी (स्वरोजगार) या श्रेणीमध्ये सांगलीच्या डॉ. पुनम उपाध्याय यांना पुरस्कृत करण्यात आले.
जन्मत: 50 टक्के चलन अक्षमता असलेल्या डॉ. उपाध्याय यांनी बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन एंड सर्जरीचा अभ्यासक्रम पूर्ण करून एमडी, पीजीपीपी आणि पीजीडीईएमएस पदवीत्तोर अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे. कामगार आणि गरीब रूग्णांना नाममात्र दराने वैद्यकीय सेवा पुरवितात.चलन अक्षमता (पुरूष) श्रेणीमध्ये कोल्हापूराच्या देवदत्त रावसाहेब माने यांना रोल मॉडेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
वयाच्या तिस-या वर्षापासून 86 टक्के चलन अक्षमता श्री माने यांच्यामध्ये आहे. त्यांनी कलाशाखेत पदवी घेतली आहे. दिव्यांगांच्या कल्याण आणि अधिकारांसाठी औद्योगिक सहकारी संस्था नावाने संस्था स्थापन केलेली आहे. 10 वर्षे ते वॉलीबॉल राष्ट्रीय स्पर्धेत खेळलेले आहेत.