<
अलिबाग(जिमाका)- रायगड किल्ल्याला भेट ही माझ्यासाठी एक प्रकारे तीर्थयात्राच असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती श्री. राम नाथ कोविंद यांनी आज येथे केले.राष्ट्रपती राम नाथ कोविंद हे रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी महामहिम राष्ट्रपतींच्या सुविद्य पत्नी श्रीमती सविता कोविंद, महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, पालकमंत्री कु.आदिती तटकरे, खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार सुनील तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, आमदार सर्वश्री भरत गोगावले, अनिकेत तटकरे, प्रशांत ठाकूर, महेश बालदी,जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, राष्ट्रपती महोदयांची कन्या स्वाती कोविंद, युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती, युवराज शहाजीराजे छत्रपती, तसेच महसूल व पोलिस विभाग तसेच इतर विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रपती श्री. कोविंद आपल्या भाषणात म्हणाले की, रायगड किल्ल्याला भेट देणे, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. या रायगड भेटीला आपण एक प्रकारची तीर्थयात्राच मानतो. या भेटीसाठी निमंत्रित केल्याबद्दल त्यांनी छत्रपती संभाजीराजे यांचे विशेष आभार मानले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापित केलेले हिंदवी स्वराज्य हे सर्व जगाला प्रेरित करणारे होते.राष्ट्रपती महोदयांनी आपल्या भाषणात गणेशोत्सव व शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक एकता, सांस्कृतिक गौरव व देशप्रेम वाढीच्या परंपरेची सुरुवात केल्याचा विशेष उल्लेख केला.