<
पाचोरा(प्रतिनिधी)- शिक्षण संस्था ह्या गोरगरीब विद्यार्थ्यांचा प्राधान्याने विचार करणाऱ्या असाव्या. गरिबांची मुले या शिक्षण संस्थांमध्ये शिकून विविध क्षेत्रात कार्यकर्तृत्व बजावतील. आज उभे राहिलेले क्रीडाशिल्प हे अशाच विद्यार्थी आणि खेळाडूंना अनेक पिढ्या प्रेरणा देत राहील. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेने नेहमीच सर्वसामान्य विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय व्हावी या हेतूने वाटचाल केली आहे.
समाजवादी विचारांच्या ओंकारआप्पा वाघ यांचे यात महत्त्वाचे योगदान आहे. संस्थेचे आताचे पदाधिकारीही तो वारसा जोमाने पुढे नेत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे विशेष सरकारी वकील पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांनी केले. सौ रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात क्रीडाशिल्प व सभागृह लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप ओंकार वाघ होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र विधान परिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक (नागपूर विभाग) शेखर पाटील उपस्थित होते. हरिभाऊ पुंजाजी तांदळे व लक्ष्मीबाई हरिभाऊ तांदळे यांच्या दातृत्वातून उभे झालेल्या क्रीडाशिल्पाचे तसेच सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. भी. ना. पाटील व वैशालीताई पाटील यांच्या भरीव आर्थिक योगदानातून आकारास आलेल्या सभागृहाचे यावेळी ॲड. निकम यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
दोन्ही दात्यांचा ॲड. निकम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, मानद सचिव ॲड. महेश देशमुख, व्हाईस चेअरमन व्ही.टी. जोशी, ज्येष्ठ संचालक नानासाहेब देशमुख, दत्तात्रय पवार, विनय जकातदार, विजय देशपांडे, मनीषा पाटील यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.
क्रीडाशिल्प व सभागृह दाते यांच्या वतीने अनुक्रमे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. दिनेश तांदळे व क्रांती पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व भूमिका पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांनी मांडली. सूत्रसंचालन डॉ. अतुल देशमुख यांनी केले तर प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला वैद्यकीय, कायदा, शिक्षण, क्रीडा, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.