<
जळगाव(प्रतिनिधी)- येथील मेहरूण भागात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा प्रित्यर्थ अखंड हरीनाम कीर्तन सप्ताह तथा संगीतमय भागवत कथेमध्ये भाविकांना दररोज परमेश्वर अनुभूती येत आहे. भागवत कथेवेळी भगवान श्रीकृष्ण जन्म आणि विवाह सोहळ्याच्या सजीव देखाव्याला भाविकांकडून उदंड प्रतिसाद लाभला.
मेहरूण परिसरात या कीर्तन सप्ताहामध्ये धार्मिक उत्साह वाढला आहे. बोदवड तालुक्यातील सुरवाडा येथील ज्ञानेश्वर महाराज शेलवडकर हे दररोज दुपारी संगीतमय भागवत कथा सांगत आहे. यामध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्म सोहळा झाला. यात वासुदेवाच्या भूमिकेत उपशिक्षक मुकेश नाईक यांनी टोपलीत श्रीकृष्णाला घेऊन जात असल्याचा सजीव देखावा सादर केला. त्यांनतर महिला भाविकांनी श्रीकृष्ण जन्मसोहळा साजरा केला. भगवान श्रीकृष्णाचा महिमा ज्ञानेश्वर महाराज यांनी कथेमध्ये सांगितला.
मंगळवारी दि. ३० नोव्हेंबर रोजी भगवान श्रीकृष्ण यांचा विवाह सोहळ्याचा सजीव देखावा साकारण्यात आला होता. या देखाव्यात भगवान श्रीकृष्णाची व रुख्मिणीची भूमिका अनुक्रमे संत ज्ञानेश्वर शैक्षणिक संस्थेचे सचिव मुकेश नाईक व त्यांच्या पत्नी स्वाती यांनी साकारला होता. सजीव देखाव्यामुळे भाविकांमध्ये चैतन्य पसरले होते.
कृष्ण एक निस्वार्थ कर्मयोगी, एक आदर्श तत्वज्ञ, एक ज्ञानी आणि दैवी साधनसंपत्ती असलेला महान माणूस होता. श्रीकृष्णाच्या सर्व पत्नींमध्ये रुक्मिणीला सर्वोच्च दर्जा होता, असे मार्गदर्शन ज्ञानेश्वर महाराज यांनी केले. प्रसंगी मेहरूणमधील नगरसेवक तथा मनपा स्थायी समिती सदस्य प्रशांत नाईक व मेहरूण भागातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.