<
नाशिक- भारतीय संस्कृतीमध्ये नऊ देव्यांचे पूजन करण्याचा धार्मिक संस्कार आहे. या सर्व नऊ देव्या ह्या शक्तीचे प्रतीक आहेत. ज्ञानधन देणारी श्री लक्ष्मी, दुर्गुणांचा नाश करणारी श्री दुर्गा, असुर संहारी श्री कालिका, मनाला संतोष देणारी देवी संतोषी अशा अनेक शक्तींनी युक्त महिलांचे प्रतीक या देव्या होय. मात्र येथे नमूद करावेसे वाटते किया या दिव्या म्हणजेच महिलांमध्ये असलेल्या शक्तीचे प्रतीक आहेत. परंतु महिलांमधील ही शक्ती आज सुसुप्त अवस्थेमध्ये आहे. या शक्तीला राजयोगा मेडिटेशन च्या माध्यमातून जागृत करणे खूप आवश्यक आहे. हाच मुख्य उद्देश ठेऊन ब्रह्माकुमारी संस्था कार्यरत आहे. असे प्रतिपादन राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंतीदिदीजी यांनी दिनांक 11 डिसेंबर रोजी म्हसरूळ, कला नगर येथील ब्रह्माकुमारी संस्थेच्या प्रभू प्रासाद सभागृहात केले. ब्रह्माकुमारी संस्थे तर्फे महिलांसाठी महिला सशक्तिकरण या एक दिवसीय व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून येथील उपमहापौर भिकूबाई बागुल, वंजारी सेवा संघ महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष डॉ. मंजुषा दराडे, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी सानप, महानगरपालिका महिला व बालकल्याण समिती सभापती स्वाती भामरे आदि मान्यवर उपस्तीत होते.
कार्यक्रमात पुढे ब्रह्माकुमारी वासंतीदिदिजी यांनी महिलांना आवाहन करत सांगितले कि आत्मबलाच्या आधारावरच विकास वा सशक्तीकरण शक्य असून राजयोग मेडीटेशन चा साप्ताहिक कोर्स आपल्या सर्वांगीण उन्नतीसाठी अतिशय आवश्यक आहे.
डॉ. मंजुषा दराडे यांनी सांगितले कि महिला सशक्तीकरण तेव्हाच शक्य आहे जेव्हा एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा सन्मान करेल. महिलांद्वारे संचालित होणारी ब्रह्माकुमारी संस्थे मध्ये सर्व कार्य मुख्यत्वे महिलांद्वारे होते. शिवाय कामांमध्ये खूप सुसूत्रता असते. महिलांचा पूर्ण सन्मान ठेऊन येथील सर्व कार्यवाही चालते. महिला सशक्ती करणाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ब्रह्माकुमारी संस्था होय. महिलांना भेडसावणाऱ्या आजारांवर डॉ. दराडे यांनी प्रकाश टाकला.
नगरसेविका स्वाती भामरे यांनी सांगितले कि महिलांमध्ये मायक्रो नियोजन असते. हे नियोजन कुटुंबासाठी पर्यायाने समाजासाठी नेहमी फलदायी असते. आपणही महिलांच्या छोट्या छोट्या समूहांना मदत करून समाज सेवेचा प्रपंच हाकला व यातूनच लोकांनी संधी दिल्याने नगरसेवक पदापर्यंत पोहचल्याचे भामरे यांनी सांगितले.
जिल्हा क्रीडा अधिकारी पदावर नुकतेच रुजू झालेल्या पल्लवी सानप यांनी आपल्या कुटुंबातील ३ महिलांचे उदाहरण देत त्या आपल्यासाठी कशा प्रेरणा स्त्रोत राहिल्या हे स्पष्ट केले. यात सानप यांनी सांगितले कि माझ्या आज्जीने एकल पालकत्व असतांना घरोघरी टोपलीत फळे विकून कुटुंबाचा निर्वाह तर केलाच मात्र ह्या हलाकीच्या परिस्थितीत माझ्या वडिलांना व काकांना सुशिक्षित करून शासनाच्या उच्चपदावर नोकरीला लावले. इकडे आईचे वडील वारकरी पंथाचे असल्याने १५-१५ दिवस घराबाहेर राहावे लागे. मात्र आईच्या आईने १४ आपत्य सांभाळत एव्हडा प्रपंच एकटीच्या हिमतीवर चालविला. सोबतच शेती मध्ये स्वतः ट्रक्टर चालाउन नांगरणी, वखरणी केली. एक महिला असून पुरुषाची सर्व जबाबदारी आजी ने पेलली. तिसरे मूर्तिमंत उदाहरण देतांना सासू सुनेच्या आदर्शाची कहाणी प्रस्तुत केली. त्यांनी सांगितले कि सासू बाईंनी धुणे भांडे करून मुलाला मर्चंट नेव्हीत अधिकारी तर मुलीला शिक्षिका केले. खूप काबाड कष्ट करून त्यांनी गरिबी मधून दिवस काढले. आज सासूबाई वयोवृद्ध झाल्या असून त्यांना डोळ्याने फक्त १० टक्के दिसते. त्यांच्याच पुण्याईने आम्ही येथे उभे असल्याचे सानप यांनी सांगितले.
उपमहापौर भिकूबाई बागुल, नगरसेविका शालिनी पवार, मिनल साठ्ये, मुग्धा तांबे, शिवप्रसाद भाई यांनी आपले हृदयस्पर्शी अनुभव प्रस्तुत केले. ब्रह्माकुमार सुरेश साळुंके यांनी राजयोग माध्यमातून माइंड पावर चे रहस्य उलगडले. कार्यक्रमाचे सफल सूत्र संचालन ब्रह्माकुमारी पुष्पा दीदी, स्वागत ब्रह्माकुमारी विना दीदी यांनी तर आभार प्रदर्शन ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी यांनी केले. कु. श्वेता ने स्वागत नृत्य करून उपस्तीतांना मनोरंजीत केले. कार्यक्रम मोठ्या संखेने परिसरातील महिला उपस्तीत होत्या. कार्यक्रमात प्रमुख् पाहुण्यांना वासंती दिदिजी यांच्या हस्ते सन्मानित कारण्यात आले.