<
नेहरूनगर येथे संगीतमय भागवत कथा कीर्तन सप्ताहाचा प्रारंभ
जळगाव (प्रतिनिधी) : व्यक्तीच्या आयुष्यात आनंद परिपूर्ण आहे. जिथे आनंद आहे, तिथे भगवान आहे. मानवधर्म काय आहे, भगवान अवतार म्हणजे काय, सर्व देवांत मोठा कोण अशा अनेक प्रश्नांचे सार भागवत कथेत आहे, असे मार्गदर्शन वृंदावन (उ.प्र.) येथील भागवताचार्य कथाकार सोपानदेव महाराज यांनी केले.
नेहरू नगरातील शिवराजे फाउंडेशन द्वारा आयोजित श्रीमद् संगीतमय भागवत कथा व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह दि. १२ डिसेंबर ते १९ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. श्रीमद् भागवत कथेचा पहिल्याच दिवशी सोपानदेव महाराज यांनी प्रारंभ केला. सुरुवातीला शिवराज्य फाउंडेशन तर्फे आयोजक समिती सभापती प्रभागातील नगरसेवक जितेंद्र मराठे यांनी सोपान महाराज यांचा पुष्पहार देऊन सन्मान केला. प्रसंगी भागवतकथेचे पूजन करण्यात आले. यानंतर भागवताचार्य सोपानदेव महाराज यांच्या संगीतमय भागवत कथेला प्रारंभ केला.
ते म्हणाले की, भक्तीविना प्रत्येक भाविक भुकेला आहे. देवाच्या नामस्मरणाने आपल्याला आत्मनुभूती प्राप्त होते. कथेवेळी, जय जय राधा रमण हरी बोल, राधे राधे अशा विविध भजनांवर भाविकांनी ताल धरला. तसेच कलाकारांनी मोरांच्या आणि राधेच्या वेशभूषेत प्रभावीपणे भक्तिगीते आणि भक्तीनृत्य सादर करीत वृंदावन येथील सजीव देखावा सादर केला. भागवताचार्य सोपान देव महाराज यांना मृदुंगावर यज्ञेश महाराज सुरतकर आणि मयूर महाराज धुळेकर, भक्ती गीत गायन सागर महाराज भवरखेडेकर, मुरली महाराज साक्रीकर, किरण महाराज पहुरकर, दीपक महाराज पाडळसेकर यांनी साथ संगत केली.
संध्याकाळी हरिपाठ घेण्यात आला. दररोज रात्री ८ ते १० या वेळेमध्ये कीर्तन सप्ताह आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये सोमवार १३ डिसेंबर रोजी पुणे येथील हभप सागर महाराज मराठे, १४ डिसेंबर रोजी जळगाव येथील हभप धनराज महाराज पाटील अंजाळेकर, १५ डिसेंबर रोजी नाशिक येथील हभप पांडुरंग महाराज गिरी, १६ डिसेंबर रोजी नाशिक येथील परमेश्वर महाराज उगले, १७ डिसेंबर रोजी पुणे येथील ज्योतीताई गरुड चाकणकर, १८ डिसेंबर रोजी जळगाव येथील हभप सागर महाराज भवरखेडेकर यांची अमृतवाणी ऐकण्याची पर्वणी भाविकांना मिळाली आहे. तसेच १९ डिसेंबर रोजी वृंदावनचे हभप सोपान महाराज यांचे काल्याचे कीर्तनाने समारोप होणार आहे. संगीतमय भागवत कथा आणि कीर्तन सप्ताहाचा भाविकांनी भरभरून लाभ घ्यावा असे आवाहन शिवराजे फाउंडेशनतर्फे नगरसेवक जितेंद्र मराठे यांनी केले आहे.