<
जळगाव, दि. 16 (जिमाका वृत्तसेवा):- ऑटो रिक्षाच्या भाडेदरात वाढ करण्यात आलेली आहे. यापूर्वीच्या भाडेदरानुसार पहिल्या 1.5 किलोमीटरकरीता आता 16 रुपयां ऐवजी 21 रुपये, तर पुढील प्रत्येक किलोमीटरला 10.89 रुपयांऐवजी 14 रुपये इतके भाडेदर निश्चित करण्यात आले आहे.
नवीन ऑटोरिक्षा भाडे दर 20 डिसेंबर 2021 पासून लागू होईल. जिल्ह्यातील सर्व परवानाधारक ऑटोरिक्षा चालकांनी रिक्षाच्या इलेक्ट्रॉनिक फेअर मीटर मध्ये 1 फेब्रुवारी, 2022 पर्यत सुधारणा करुन व शासकीय तंत्रनिकेतन, महाविद्यालय, जळगाव यांच्याकडून फेअर मिटर प्रमाणित करुन घ्यावे. प्रवाशांनी सुध्दा सुधारित भाडेदराची नोंद घेवून त्याप्रमाणे प्रवास झाल्यास नमूद असल्याप्रमाणे संबंधित ऑटोरिक्षाधारकास भाडे अदा करावे,
जे ऑटोरिक्षा धारक विहीत मुदतीत त्यांच्या ऑटोरिक्षांचे फेअर मिटर ( रि-कॅलिब्रेशन) करणार नाहीत त्यांच्याविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येईल. विहित मुदतीत मीटर कॅलिब्रेशन न करणे – मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी 1 दिवस परवाना निलंबन मात्र किमान 7 दिवस, कमाल निलंबन कालावधी 30 दिवस राहील. मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसासाठी किमान रु. 50/- मात्र कमाल रु. 500/- तथापि कमाल तडजोड शुल्क रु. 1000/- पेक्षा अधिक असणार नाही.
जळगाव शहरातील सर्व नागरिकांनी जळगाव शहरातील ऑटोरिक्षा परवाना धारक प्रवाशांच्या मागणीप्रमाणे मीटरप्रमाणे भाडे आकरणी करत नसतील, तर अशा ऑटोरिक्षा धारकाविरुध्द उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांच्या कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक 0257- 2220766 किंवा mh१९@mahatranscom.in किंवा शहर वाहतूक शाखा, जळगाव यांचा दूरध्वनी क्रमांक 0257- 2220766 वर तक्रार करु शकतात, असे उपप्रादेशिक परिवहन विभागाने कळविले आहे.