<
भुसावळ(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उत्कृष्ट क्रीडापटू आहेत. त्यांच्याकडे जशी खिलाडूवृत्ती आहे तशी प्रत्येकाकडे असायला हवी. जय पराजयाची ते चिंता करीत नाहीत. लढणे हा त्यांचा स्थायीभाव आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते तथा माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी भुसावळात केले.
भुसावळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी चषक जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धा (पुरुष गट) आयोजित केलेल्या आहेत. जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जय गणेश फाऊंडेशन स्पोर्ट्स क्लबने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यात उद्घाटन सत्रात माजी महसूलमंत्री खडसे हे बोलत होते. नगराध्यक्ष रमण भोळे यांनी ध्वजारोहण तर उद्योजक राजेश राका यांनी क्रीडांगण पुजन केले. फाउंडेशनचे संस्थापक व माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी प्रास्ताविक केले.
व्यासपीठावर दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्राचे निवृत्त मुख्य अभियंता आर. आर. बाविस्कर, अशोक लाडवंजारी, अनिल जैन, प्रा. डॉ. सुनील नेवे, हुस्नोद्दीन समशोद्दीन, दिलीप खंडेलवाल, सार्थक चोपडा, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, शेख शफी, वसंत पाटील, पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रेवार, जळगाव कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह नितीन बरडे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन जय गणेश फाऊंडेशन चे समन्वयक गणेश फेगडे यांनी केले. स्पर्धेत जिल्ह्य़ातील 28 संघ सहभागी झाले आहेत. दोन दिवस डे-नाइट हे सामने होत आहेत. जय गणेश फाऊंडेशनचे अध्यक्ष धीरज धांडे, सचिव तुषार झांबरे, जय गणेश स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष नीलेश कोलते, कार्याध्यक्ष चैत्राम पवार यांच्यासह 25 मंडळांचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
शरद पवारांकडील खिलाडूवृत्ती आदर्श राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे उत्कृष्ट क्रीडापटू आहेत. प्रत्यक्ष न खेळताही भल्याभल्यांना ते गारद करतात. लढणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. जय-पराजयाची ते तमा बाळगत नाहीत. क्रिकेटपेक्षा ते देशी खेळांना अधिक प्राधान्य देतात. भुसावळात राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडेंनी कबड्डी या देशी खेळाच्या स्पर्धा आयोजित करून मोलाचा संदेश दिला आहे, अशा शब्दांत नेमाडेंच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
पहिल्या दिवशी रंगलेले सामने….
जळगावच्या क्रीडा रसिक संघाने भुसावळच्या जय मातृभूमी संघाचा तर जळगावच्या महर्षी वाल्मिक संघाने चाळीसगाव येथील कै. वसंतराव नाईक संघाचा पराभव केला. दोन्ही सामने रंगतदार झाले. रात्री उशिरापर्यंत चुरशीचे सामने सुरू होते.